सावनेर बसस्थानकाचे रूपडं पालटणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:10 AM2021-08-15T04:10:59+5:302021-08-15T04:10:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : चार प्रमुख महामार्गांना जाेडणाऱ्या सावनेर शहरातील बसस्थानक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथूनच मध्य प्रदेशातील विविध ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : चार प्रमुख महामार्गांना जाेडणाऱ्या सावनेर शहरातील बसस्थानक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथूनच मध्य प्रदेशातील विविध शहरांत बसेस धावतात. येथील बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी २०१९ मध्ये भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु दाेन वर्षांचा कालावधी उलटूनही बांधकाम अपूर्णच आहे. त्यामुळे या बसस्थानकाचे रूपडं पालटणार कधी? असा प्रश्न प्रवाशांसह नागरिक विचारत आहेत.
दिल्ली, जबलपूर, भाेपाळ, अमरावती, छिंदवाडा, नागपूर अशा महत्त्वाच्या महामार्गांना जाेडणाऱ्या सावनेर बसस्थानक येथे प्रवाशांची सतत रेलचेल असते. तालुक्यात काेळसा, मॅग्निज खाणी व औद्याेगिक क्षेत्र असल्याने शेकडाे अधिकारी, कर्मचारी दरराेज ये-जा करतात. शिवाय तालुक्यातील खेड्यापाड्यांच्या नागरिकांची शहरात ये-जा असते. यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी बघायला मिळते. परंतु बसस्थानकाचे बांधकाम रखडले असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागताे.
दाेन वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेले बांधकाम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. यामुळे प्रवाशांचे अक्षरश: हाल हाेताना दिसून येते. या प्रकारामुळे बसचालक, अधिकारी-कर्मचारीसुद्धा त्रासले आहेत. बसस्थानकाच्या आवारात सर्वत्र बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. यामुळे बसेस फलाटावर लावताना अडचण हाेते. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
...
असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला
बसस्थानकाच्या अर्धवट बांधकामामुळे या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. गावखेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाेस्ट नाक्यावर गैरसाेयीचा सामना करावा लागताे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. तालुक्यातील नागलवाडी, रायवाडी, आग्रा, जटामखाेरा येथे मुक्कामी बसफेऱ्या हाेत्या. यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना सकाळी लवकर शहराच्या ठिकाणी जाता येत हाेते. मात्र या मुक्काम बसफेऱ्या बंद झाल्याने गावकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी व लाेकप्रतिनिधींनी लक्ष पुरवून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.