एसटीच्या निवृत्त कामगारांचे १२ कोटी कधी मिळणार; न्यायालयातून न्याय मिळाला

By नरेश डोंगरे | Published: April 7, 2024 10:35 PM2024-04-07T22:35:53+5:302024-04-07T22:36:06+5:30

अधिकाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप

When will ST retired workers get 12 crores; | एसटीच्या निवृत्त कामगारांचे १२ कोटी कधी मिळणार; न्यायालयातून न्याय मिळाला

एसटीच्या निवृत्त कामगारांचे १२ कोटी कधी मिळणार; न्यायालयातून न्याय मिळाला

नरेश डोंगरे - नागपूर

नागपूर : वृद्धत्वामुळे आर्थिक चणचण भोगणाऱ्या एसटीच्या सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना 'लालफितशाही'मुळे आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यांची सुमारे १२ कोटींची रोकड अडकून पडली असून, ही रक्कम कधी परत मिळणार, असा केविलवाणा सवाल ही मंडळी करीत आहे.

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये एसटी मध्यवर्ती कार्यालयातून एक आदेश धडकला होता. त्यात कामगारांना दिलेला आर्थिक सेवा लाभ काढून घेण्याचे निर्देश होते. कामगारांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. २०१८ मध्ये कामगारांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर प्रशासन उच्च न्यायालयात गेले. तेथेही न्यायालयाने २०२३ मध्ये कामगारांच्या बाजूने निकाल दिला. आता या घडामोडीला आठ महिने झाले. मात्र, एसटी प्रशासनाने अद्याप कामगारांना त्यांचे हक्काचे आर्थिक लाभ दिलेले नाही.

रा. प. निवृत्त कर्मचारी संघटनेचे प्रदेश सचिव अजय हट्टेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४४ निवृत्त कामगारांची प्रत्येकी ५ ते १२ लाखांची रक्कम यामुळे अडकून पडली आहे. ती साधारणत: १२ कोटींच्या घरात आहे. एसटीत पगार कमी असल्याने निवृत्तीवेतनही तुटपुंजे मिळते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची हलाखीची स्थिती आहे. त्यांना त्यांची रक्कम तातडीने देण्यात यावी, यासाठी एसटीचे उपाध्यक्ष आणि विभागीय संचालकांच्या वारंवार भेटी घेण्यात आल्या. निवेदन देण्यात आले. मात्र, त्याचा लाभ झाला नसल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे हट्टेवार यांनी म्हटले आहे.

अन्यथा आंदोलन करू

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांची हक्काची रक्कम द्यावी. तसे झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा रा. प. निवृत्त कर्मचारी संघटनेने दिला आहे.

Web Title: When will ST retired workers get 12 crores;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.