पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 AM2021-03-06T04:09:20+5:302021-03-06T04:09:20+5:30
सावनेर : पशूंना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोरोना संक्रमण काळातही ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने अविरत सेवा देण्यात येत ...
सावनेर : पशूंना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोरोना संक्रमण काळातही ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने अविरत सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण तातडीने होणे गरजेचे आहे.
गतवर्षी पशुपालकांच्या जनावरांची काळजी घेण्यासाठी ग्रामीण भागात फिरणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागणी झाली होती. आताही ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट व्हेटरनरी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर यांना विचारणा केली असता, मेडिकलच्या डॉक्टरप्रमाणेच पशुवैद्यक सुध्दा सातत्याने सेवा देत आहे. त्यामुळे फ्रंट लाईन वर्करप्रमाणे पशुसंवर्धन विभागातील फिल्डवरील कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहिमेत प्राथमिकता देणे गरजेचे असल्याचे पोहरकर यांनी सांगितले. आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचारयांचे लसीकरण सुरू असून टप्प्या-टप्प्याने इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे प्रभारी तहसीलदार चैताली दराडे यांनी स्पष्ट केले.