शिक्षकांना वेतन मिळणार कधी?
By admin | Published: October 27, 2016 02:45 AM2016-10-27T02:45:21+5:302016-10-27T02:45:21+5:30
शहरातील राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेठीस धरले जात आहे.
मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयात ११ शिक्षक कार्यरत
काटोल : शहरातील राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेठीस धरले जात आहे. या शाळेतील काही शिक्षकांना शाळा अनुदानावर येताच कामावरून कमी करून वेतन देणे बंद केले आहे. या शिक्षकांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यापासून तर आंदोलन करण्यापर्यंतचे पर्याय अवलंबले. परंतु, प्रशासन त्यांचा तिढा सोडविण्याकडे लक्ष देत नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
काटोल - कारंजा मार्गालगत सरस्वती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सन १९९५ मध्ये राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयात काटोल, नरखेड, कळमेश्वर तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा, छिंदवाडा, मुलताई, प्रभातपट्टण, बैतूल, इटारशी या भागातील विद्यार्थी शिकायला येतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या विद्यालयात शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. परंतु, या शिक्षकांना गेल्या २० वर्षांपासून पूर्ण वेतन देण्यात येत नाही. शाळा अनुदानावर येताच त्यांना कामावरून कमी करण्यात आले. परिणामी, या विद्यालयातील बिनपगारी शिक्षकांनी मध्यंतरी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन ही समस्या सोडविण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी ही समस्या न सोडविण्याल्याने या शिक्षकांनी धरणे आंदोलनही केले. तरीही प्रशासनाने या शिक्षकांच्या रास्त मागणीकडे लक्ष दिले नाही. (तालुका प्रतिनिधी)
उच्च न्यायालयात मागितली दाद
संस्था चालकाच्या मनमानी कारभाराचा त्रास व्हायला लागल्याने काही शिक्षकांनी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त तर एका शिक्षकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली. परंतु, या शिक्षकांची नावे हजेरीपटात समाविष्ट करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर, अस्थिव्यंग विभागातील तीन शिक्षकांना संस्था चालकाकरवी विद्यालयाच्या कार्यालयात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला.