डॉक्टरांचे अक्षर कधी सुधारणार? प्रिस्क्रीप्शनबाबत एमएमसीचा आदेश टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 09:01 PM2022-09-29T21:01:25+5:302022-09-29T21:05:19+5:30
Nagpur News केमिस्टकडून चुकीची औषधे दिली जाणार नाहीत. यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) देशभरातील डॉक्टरांना अक्षर सुधारण्याचा डोसही दिला, मात्र, याची अंमलबजावणीच होत नसल्याचे शहरातील बहुसंख्य इस्पितळांमधील चित्र आहे.
नागपूर : डॉक्टरांनी रुग्णाला औषधे लिहून देताना (प्रिस्क्रीप्शन) काळजीपूर्वक ‘कॅपिटल लेटर्स’मध्ये लिहावीत, जेणेकरून केमिस्टकडून चुकीची औषधे दिली जाणार नाहीत. यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) देशभरातील डॉक्टरांना अक्षर सुधारण्याचा डोसही दिला, मात्र, याची अंमलबजावणीच होत नसल्याचे शहरातील बहुसंख्य इस्पितळांमधील चित्र आहे.
‘एखाद्याचे हस्ताक्षर वाईट असेल तर तो मोठेपणी नक्कीच डॉक्टर होणार,’ असे शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच गमतीने बोलले जाते. कारण डॉक्टरांचे अक्षर औषध विक्रेत्यांशिवाय कोणालाही वाचता येत नाही. मात्र, औषध विक्रेत्यालाही हे अक्षर वाचता आले नाही तर त्याच्याकडून चुकीचे औषधे दिली जाऊ शकतात. परिणामी, रुग्णांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणामही होऊ शकतो. हाच धोका लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने राज्यातील डॉक्टरांचे हस्ताक्षर सुधारण्याचा उपक्रम हाती घेतला होता. राज्य सरकारनेही त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला. मात्र या संदर्भातील आदेशच निघाले नसल्याने डॉक्टरांचे अक्षरसुधार योजना बारगळली.
डॉक्टरांनी औषधांची नावे लिहिताना ब्रँडेड नावासह कंसात औषधांची जेनरिक नावेदेखील डॉक्टरांनी लिहावीत. रजिस्ट्रेशन क्रमांकही त्यावर लिहावा, असे आदेश ‘एमसीआय’ने दिले होते. ‘टेक्नोसॅव्ही’ झालेले बोटावर मोजण्या इतके डॉक्टर वगळल्यास आजही जवळपास ५० टक्क्यांवरील डॉक्टर वाईट हस्तक्षरांमध्येच प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहेत.
-‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवे
डॉक्टरांचे ‘प्रिस्क्रीप्शन’ कसे असावे, या संदर्भात ‘एफडीए’ने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सोबत घेऊन पुढाकार घ्यायला हवे. असे झाल्यास डॉक्टरांसोबतच रुग्णांनाही मदत होईल, असे ‘आयएमए’च्या काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.