लांब शेपटीचा धूमकेतू दिसणार तरी कधी? विस्मयकारी घटना पाहण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 06:37 AM2023-09-10T06:37:59+5:302023-09-10T06:39:05+5:30
आकाशात विस्मयकारी घटना पाहण्याची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंतराळातील आणखी एक विस्मयकारी घटना पाहण्याची संधी खगाेलप्रेमींना मिळणार आहे. साेमवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान पूर्व दिशेला सूर्य उगवण्यापूर्वी एका धूमकेतूचे दर्शन घेता येईल. ‘निशीमुरा’ असे आकाशातील या नव्या पाहुण्याचे नाव आहे. हा धूमकेतू तब्बल ४०० वर्षांनंतर पृथ्वीजवळ येताे आहे. ११ ते १७ सप्टेंबर यादरम्यान पहाटे साधारण सव्वा पाच ते साडेपाचच्या आसपास या नवीन पाहुण्याचे दर्शन होणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्याच महिन्यात नव्याने शोध
एक अनियमित स्वरूपाचा धूमकेतू जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमुरा यांनी गेल्याच महिन्यात नव्याने शोधला. त्यांच्याच नावावर या धूमकेतूला ‘निशीमुरा’ असे संबाेधण्यात आले आहे.
पूर्व क्षितिजावर दर्शन
लांबलचक शेपटीचा धूमकेतू अर्थात शेंडे नक्षत्र म्हणून अशीही त्याची ओळख आहे. ११ सप्टेंबरला रोजी पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समूहात युती होत आहे, त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू आपल्याला पूर्व क्षितिजावर पाहता येईल.
या धूमकेतूचे सूर्यापासून सरासरी अंतर जवळपास पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या ५७ पट एवढे असते. नुकताच सापडलेला हिरवा धूमकेतू ५० हजार वर्षांनतर प्रथमच पृथ्वीजवळून जात आहे.