विदर्भात शाळेची घंटा कधी वाजणार, २७ की २९ जूनला? शिक्षक व पालक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 01:32 PM2022-06-14T13:32:21+5:302022-06-14T13:34:42+5:30
राज्य शासनातील दोन विभागांमध्येच समन्वय नसल्याने शाळा २७ की २९ जूनपासून सुरू होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पाल्यांना शाळेत पाठवायचे कधी? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
नागपूर : शिक्षण आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार २७ जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २९ जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. राज्य शासनातील दोन विभागांमध्येच समन्वय नसल्याने शाळा २७ की २९ जूनपासून सुरू होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पाल्यांना शाळेत पाठवायचे कधी? असा प्रश्न पालकांना पडला आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे कधी? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
राज्यातील इतर विभाग वगळता विदर्भातील तापमान लक्षात घेता २०२२-२३ च्या शैक्षणिक सत्रात येथील राज्य शासनाच्या अखत्यारित शाळा २७ जून २०२२ पासून सुरू करण्याचे पूर्व नियोजित आहेत. याबाबतच्या सूचनाही बहुतांश शाळांनी पालकांना केल्या आहेत. शिक्षण आयुक्तालयाकडून ९ जून २०२२ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार २४ ते २५ जूनदरम्यान सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने उद्बोधन करून २७ जूूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे आहे. तर १० जून रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार विदर्भातील शाळांकरिता २७ आणि २८ जून रोजी येथील शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने उद्बोधन करावे. २९ जूूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, असे नमूद केले आहे. यामुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या तारखेचा संभ्रम निर्माण झाला आहे.
शासन निर्देशानुसार निर्णय होणार
शाळा कोणत्या तारखेला सुरू करावयाच्या, याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. याबाबत लवकरच सूचना प्राप्त होतील. त्यानुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.
रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प.