प्रादेशिक मनोरुग्णालयातील मृत्यूची मालिका थांबणार कधी? तीन दिवसांत चार मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 08:00 AM2022-11-22T08:00:00+5:302022-11-22T08:00:01+5:30
Nagpur News नागपूरच्या मनोरुग्णालयात गेल्या चार दिवसात तीन मृत्यू झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : मनोरुग्णालयात भरती होऊन दीड तासातच एक महिला रुग्ण आपला गाऊन फाडून स्वत:चा गळा आवळून आत्महत्या करते. या घटनेच्या पाठोपाठ पुढील दोन दिवसांत आणखी तीन मनोरुग्णांचा मृत्यू होतो. परंतु त्यानंतरही आरोग्य विभागात खळबळ नाही. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच आरोग्य खात्याचे कामकाज सुरू असल्याचे यावरून दिसून येते.
मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयाची स्थापना केली. मात्र, सरकारी अनास्थेमुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना, आजही जुन्याच पद्धतीचे उपचार व औषधींंचा वापर सुरू आहे. त्यात रुग्णालयातील मृत्यूच्या मालिकेकडे कोणी लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- तीन महिला, एका पुरुषाचा मृत्यू
प्रतिभा कोल्हे, ३८ वर्षीय महिला १६ नाव्हेंबर रोजी प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती झाली. परंतु दीड तास होत नाही, तोच तिने स्वत:चा गाऊन फाडून, गळ्याभोवती आवळून आत्महत्या केली. हे प्रकरण ताजे असताना दुसऱ्याच दिवशी, १७ नोव्हेंबर रोजी शीला भैसारे या ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हिला मारझोड झाल्याने १२ नाेव्हेंबर रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. पाच दिवसांनंतर तिचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. मारझोडचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. १९ नोव्हेंबरला दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात अरुणा मेश्राम या ६२ वर्षीय रुग्णाला वृद्ध व्यक्तीमध्ये आढळणारा ‘प्रॉक्सिमल ह्युमरस फ्रॅक्चर’ झाल्याने १७ नोव्हेंबर रोजी मेडिकलला भरती करण्यात आले. परंतु दोन दिवसांतच तिचा मृत्यू झाला. भाऊराव पाटील या ६२ वर्षीय रुग्णाचे मांडीचे हाड फ्रक्चर झाल्याने २ नोव्हेंबर रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. १७ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. तीन दिवसांत तीन महिला व एका पुरुषाच्या मृत्यूची अलिकडच्या काळातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
-मृत्यूचे आणखी एक कारण डॉक्टर, कर्मचाºयांची कमतरता
मनोरुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टर, अटेन्डंट व कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. रिक्त पदे भरली जात नसल्याने प्रत्येकावर कामाचा ताण वाढला आहे. यातूनच रुग्णांकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याने मृत्यूचे हेही एक कारण असल्याचे मानले जात आहे.
-‘डेथ ऑडिट’मधून मृत्यूचे कारण पुढे येणार
मनोरुग्णालयातील प्रत्येक मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ केले जाते. यामुळे नेमके कारण लवकरच पुढे येईल. या शिवाय, जे रुग्ण वृद्ध आहेत, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा ‘कोमॉर्बिडिटी’ आहे अशा रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
-डॉ. श्रीकांत कोरडे, वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय