समीक्षणाची पाश्चिमात्य चौकट कधी ओलांडणार? - म. रा. जोशी
By प्रविण खापरे | Published: November 8, 2022 03:35 PM2022-11-08T15:35:24+5:302022-11-08T15:44:11+5:30
अविनाश आवलगावकर यांना ‘संशोधन महर्षी’ पदवी प्रदान : द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नागपूर : जोवर महानुभावी वाङ्मय साहित्याची दखल घेतली जाणार नाही, तोवर मराठी साहित्यातील चढउताराचा इतिहास सांगता येणार नाही. मराठी समीक्षक अजूनही पाश्चिमात्य चौकटीतच आहेत. तिकडल्या भावभावनांचे समीक्षण करण्याची चौकट आपल्याकडील भावभावनांचे समीक्षण करण्यास लागू तरी होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मधूकर रामदास जोशी यांनी पाश्चिमात्य चौकट ओलांडून मराठी साहित्यिकांनी महानुभवांची चिकित्सापद्धती आत्मसात करण्याचे आवाहन आज (दि. ८) येथे केले.
विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे आयोजन धरमपेठ येथील वनामतीच्या आवारात करण्यात आले. रविवारी या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून डॉ. म.रा. जोशी आपल्या चिंतन व्यक्त करत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांना विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘संशोधन महर्षी’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनिषा नागपूरे यांनी मानपत्राचे वाचन केले. याचवेळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा व साहित्याचा इतिहास लिहिण्यासाठी महानुभावी साहित्याचा आधार घ्यावाच लागतो. महानुभावी साहित्यातील ‘सुत्रपाठ’ नंतर मराठी साहित्यात कोणतेही सुत्रपाठ लिहिले गेले नाही. लिळाचरित्र, सुत्रपाठ, दासबोध आदींचा शोध घेण्यासाठी त्यांची रचना कळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समीक्षणाची भारतीय चौकट महत्त्वाची ठरणार असल्याचे डॉ. म. रा. जोशी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी सरस्वती स्तवन व महाराष्ट्र गीत अश्विनी दळवी यांनी गायले. प्रास्ताविक व परिचय डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. संचालन डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रणव हळदे यांनी मानले.
संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार - आवलगावकर
- कोणत्याही संप्रदायांचे संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार असून विद्यापीठांनी संत साहित्यांकडे उदारतेने बघण्याचे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांनी यावेळी केले. महानुभावांनी वेद स्विकारले किंवा नाकारले नाही तर त्याही पुढचा विचार दिला आहे. समीक्षकांनी संप्रदयांमध्ये भेट पाडू नये आणि द्वेष पसरवू नये. विचारांमध्ये मतभेद असणे हेच विचारांच्या जीवंतपणाचे लक्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले.