उमरेड येथे सुलभ संकुलाची सुविधा होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:46+5:302021-07-22T04:07:46+5:30

उमरेड : ५० हजाराची लोकसंख्या पार करणाऱ्या उमरेड नगरीत सुलभ संकुलाची सुलभ व्यवस्था नाही. केवळ जुने बसस्थानक परिसरात एकमेव ...

When will there be an easy package facility at Umred? | उमरेड येथे सुलभ संकुलाची सुविधा होणार कधी?

उमरेड येथे सुलभ संकुलाची सुविधा होणार कधी?

Next

उमरेड : ५० हजाराची लोकसंख्या पार करणाऱ्या उमरेड नगरीत सुलभ संकुलाची सुलभ व्यवस्था नाही. केवळ जुने बसस्थानक परिसरात एकमेव संकुल असून अन्य ठिकाणी शौचालय, स्वच्छतागृह याबाबतची वानवा आहे. संत जगनाडे महाराज व्यावसायिक संकुल येथे सध्या दोन स्वच्छतागृह व शौचालय आहेत. याठिकाणी शौचालयाचा दरवाजा महिनाभरापासून अर्धा तुटलेला आहे. शिवाय ठिकठिकाणी घाणीचे, दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे.

उमरेड येथे उपविभागीय कार्यालय तसेच कृषी, पोलीस, विद्युत आदी विभागांचेही विभागीय कार्यालये आहेत. शिवाय बाजारपेठ मोठी असल्याने लगतच्या भिवापूर आणि कुही तालुक्यातील नागरिकांची ये-जा दिवसभर सुरूच असतो. शिवाय तब्बल १९२ गावांचा उमरेड तालुका विस्तारलेला आहे. अशावेळी काही प्रमुख चौकात, परिसरात शौचालये आणि स्वच्छतागृहांची अत्यंत गरज आहे. आतापर्यंत ही सुविधा ठिकठिकाणी व्हायला हवी होती. ती का झाली नाही, असा सवाल नागरिकांचा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक, भिसी नाका चौक परिसरात दररोज हजारो नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनाने तसेच एसटी बसने प्रवास करीत उमरेड येथे येतात. अशावेळी या परिसरात कुठेही सुलभ संकुल नसल्याने अनेकांची चांगलीच पंचाईत होते. पुरुषवर्ग कोपऱ्यात, भिंतीवर, आडोसा बघत कुठेही घाण पसरवतात. महिलांची गोची होते.

‘मेरा उमरेड, मेरी शान’, ‘स्वच्छ उमरेड, सुंदर उमरेड’ असे विविधांगी अभिमानास्पद बिरुद उमरेडकर वापरतात. शिवाय स्वच्छतेच्या बाबतीत राज्य स्तरावर अनेक पुरस्काराची मानकरीसुद्धा ही नगरी ठरली आहे. असे असतानाही शौचालये आणि स्वच्छतागृहे याबाबतीत अद्याप नगर पालिका अपयशी ठरलेली दिसते. नगर पालिकेने याबाबतीत तातडीने पाऊल उचलावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

मंजूर सुलभ संकुल कधी?

उमरेड शहरात चार ते पाच ठिकाणी ‘पे अ‍ॅन्ड युज’ या तत्त्वावर सुलभ संकुल मंजूर झाले आहेत. प्रत्येकी सुमारे ३० लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला असून सुविधायुक्त असे सुलभ संकुल राहणार आहेत. यासाठी शासकीय विश्रामगृह, शासकीय धान्य गोदाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक, इतवारी भाजी बाजार आणि गांगापूर चौक परिसरात जागा निर्धारित करण्यात आली होती. अशावेळी कुठे जागा अपुरी तर कुठे या ठिकाणी सुलभ संकुल करू नका अशाप्रकारे अडथळा दिला जात आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी गावाच्या भल्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि मंजूर झालेली सुलभ संकुले तातडीने उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे.

-------------

उमरेड येथील संत जगनाडे महाराज व्यावसायिक संकुलातील शौचालयाचा दरवाजा असा अर्धवट तुटलेला आहे.

Web Title: When will there be an easy package facility at Umred?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.