वाडीत शासकीय रुग्णालय कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:53+5:302021-06-03T04:07:53+5:30
१ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोणी नाही सुरेश फलके वाडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले. ...
१ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोणी नाही
सुरेश फलके
वाडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले. मात्र, उपराजधानीनजीकच्या वाडी नगर परिषद क्षेत्रात एकही शासकीय रुग्णालय नसल्याने कोरोनाच्या संक्रमण काळात येथील नागरिकांचे हाल झाले. नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयाशिवाय दुसरा कोणताही पर्याय येथील सामान्य नागरिकाजवळ उपचारासाठी नव्हता.
वाडी शहराच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग, अंबाझरी आयुध निर्माणी, हिंगणा एमआयडीसी, ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे मोठे जाळे आहे. यामुळे या परिसरात परप्रांतीय कामगारांची संख्या अधिक आहे. शहराच्या लोकसंख्येत सातत्याने भर पडत आहे. येथील तत्कालीन प्रशासनाने शहरातील विविध क्षेत्राचा विकास करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला; परंतु अपुऱ्या निधीमुळे स्थानिक शासनाच्या मोठ्या योजनांपासून दूर राहिले. पाच वर्षांपूर्वी वाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर ‘ब’ वर्ग नगर परिषदेमध्ये झाले. त्यावेळी नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. आरोग्याच्या दृष्टीने सारासार विचार करता तातडीने सर्व सुविधांयुक्त शासकीय रुग्णालय शहरात निर्माण होणे ही शासन-प्रशासन व नेत्यांची जबाबदारी असताना नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. सद्य:स्थितीत शहरात खासगी हॉस्पिटल व दवाखाने असले तरी तिथे उपचार घेणे कामगार वर्गाच्या आवक्याबाहेर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य माणसाचे अर्थचक्र कोलमडले आहे. अनेकांचा रोजगार हिरावला गेला. कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले. अशा खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेण्याचा प्रश्नच नाही.
माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी नवनीतनगर येथील डिफेन्सच्या जागेत १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले होते. मात्र, वासनिक दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर हा मुद्दा मागे पडला. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे वाडी शहरातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा विषय लावून धरला तर वाडीत शासकीय रुग्णालय शक्य आहे. यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.