कचरामुक्त शहर कधी होणार?

By Admin | Published: May 9, 2017 02:09 AM2017-05-09T02:09:57+5:302017-05-09T02:09:57+5:30

घनकचरा व्यवस्थापन ही उपराजधानीतील मोठी समस्या बनली आहे.

When will the trash-free city ever happen? | कचरामुक्त शहर कधी होणार?

कचरामुक्त शहर कधी होणार?

googlenewsNext

ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे : कसे होणार ‘स्वच्छ’ नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घनकचरा व्यवस्थापन ही उपराजधानीतील मोठी समस्या बनली आहे. उपलब्ध माहितीनुसार रोज शहरातील एका घरातून सरासरी ३५० ते ४०० किलोग्रॅम कचरा निघतो. अशाप्रकारे संपूर्ण शहरातून प्रतिदिवशी एक हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक कचरा गोळा होतो. मात्र या सर्व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी दुर्दैवाने शहरात कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. मग असे असताना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला क्रमांक कसा मिळणार? आणि आपले नागपूर ‘स्वच्छ’ कसे होणार, असा सहज प्रश्न निर्माण होतो.
शहरातील या कचरा व्यवस्थापनासाठी मनपा प्रशासनासह शहरातील नागरिकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी रोज घराघरात ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा लागेल. नागरिकांना स्वत:च आपल्या घरात दोन वेगवेगळे ‘डस्टबिन’ ठेवावे लागणार आहेत. यासाठी नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन ही नागपूरसारख्या विकासाकडे अग्रेसर असणाऱ्या शहरासाठी मोठी समस्या बनली आहे.
सध्या ओला व सुका घनकचरा एकत्रच विसर्जित करण्यात येतो. यामुळे पर्यावरणाचे तसेच नागरी स्वास्थ्याचे मोठे प्रश्न निर्माण होतात. शहरात काही ठिकाणी कचरा वेगवेगळा गोळा करण्यात येतो, मात्र हे प्रमाण फार थोडे आहे. ओला व सुका कचऱ्याचे विभक्तीकरण न केल्यामुळे कचऱ्यावर विविध तांत्रिक प्रक्रिया करतानादेखील अडचणी येतात. तज्ज्ञांच्या मते, शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यापैकी ६० टक्के कचऱ्याचे २४ तासात जैविकरीत्या विघटन करणे शक्य आहे. मात्र त्यासाठी घरांमधून निघणारा कचरा हा ओला आणि सुका वेगवेगळा झाला पाहिजे, अन्यथा तो विघटन होऊ शकत नाही.
त्यामुळे जर घरापासूनच कचरा विलग होऊन आला तर घनकचरा व्यवस्थापनास नवी दिशा मिळेल, असेही सांगितले जात आहे. शहरातील सर्वात मोठा बाजार असलेल्या कळमना बाजारात वर्षभरात तब्बल ६,२७८ टनांहून अधिक कचरा गोळा होतो. यानंतर तो सर्व कचरा भांडेवाडी येथील ‘डम्पिंग यार्ड’मध्ये फेकला जातो. मात्र या ‘वेस्ट’वर जर योग्य प्रक्रिया झाली तर त्यापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसुद्धा होऊ शकते.

उपराजधानीत रोज निघतो हजार मेट्रिक टन कचरा
रोज शहरातील प्रत्येक घरातून सरासरी ३५० ते ४०० किलोग्रॅम कचरा निघतो. यानुसार एका दिवशी संपूर्ण शहरात तब्बल एक हजार मेट्रिक टनाहून जास्त कचरा गोळा होतो. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे या घनकचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. दररोज निघणाऱ्या या कचऱ्यापैकी ६० टक्के कचऱ्याचे २४ तासात विघटन होणे शक्य आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना स्वत:च आपल्या घरातील कचरा हा ओला व सुका वेगवेगळा करावा लागेल. परंतु तसे होत नाही. प्रत्येक घरामधून निघणारा कचरा हा ओला-सुका असा मिश्र स्वरूपाचा असतो. त्यामुळे त्याचे विघटन होत नाही.
कचरा व्यवस्थापनाचा अभाव
मागील काही वर्षांत भांडेवाडी परिसर हा अक्षरश: कचऱ्याचे ‘डम्पिंग यार्ड’ बनले आहे. यातून या संपूर्ण परिसराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस कचऱ्याखाली येणाऱ्या जमिनीत वाढ होत आहे. ही समस्या दूर कशी होणार, हा प्रश्न स्थानिक प्रशासनाला सतावत आहे. मात्र या सर्व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले तर शहरातील ही समस्या सुटू शकते. परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांना पुढाकार घ्यावा लागेल.

मनपाकडे अ‍ॅक्शन
प्लॅन हवा
‘शहरातील कचरा व्यवस्थापनात नागपूर महानगरपालिकेची फार मोठी भूमिका आहे. परंतु मनपा आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. मनपाने शहरातील कचरा गोळा करण्यासाठी कंत्राट दिला आहे. परंतु त्या कंत्राटातील गोष्टींचीसुद्धा योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराला स्वच्छ करायचे असेल तर यात नागरिकांचाही तेवढाच सहभाग लागणार आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, शिवाय एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून तो नागरिकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. परंतु ते सुद्धा होताना दिसून येत नाही.’
अनसूया काळे-छाबरानी
अध्यक्षा-‘स्वच्छ’ स्वयंसेवी संस्था.

नागरिकांचा पुढाकार हवा
‘शहरात कचरा व्यवस्थापनाची खरंच मोठी समस्या आहे. मनपा प्रशासनातर्फे ही समस्या सोडविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यात नागरिकांच्या पुढाकाराशिवाय यश मिळू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. शिवाय कुठे तरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. शहराला ‘स्वच्छ’ आणि ‘सुंदर’ बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. मात्र त्यात आपण कुठे तरी कमी पडत असल्यानेच राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात आपले शहर मागे पडले आहे.
शेफाली दुधबळे,
सचिव-‘स्वच्छ’ स्वयंसेवी संस्था.

Web Title: When will the trash-free city ever happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.