हिवाळी परीक्षेची नियमावली कधी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:06+5:302021-03-23T04:09:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना २५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. परीक्षा संकेतस्थळाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना २५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. परीक्षा संकेतस्थळाच्या माध्यमातून होतील, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र परीक्षेची नेमकी पद्धत व नियमावली अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून वारंवार विद्यापीठ व महाविद्यालयांत त्यासंदर्भात विचारणा होत आहे. विद्यापीठ नियमावली कधी जारी करेल, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.
हिवाळी परीक्षांना २५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात बीएसस्सी, बीकॉमसह विविध परीक्षा होणार आहेत. मात्र ऑनलाईन परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने होतील हे स्पष्ट झाले नव्हते. ‘अॅप’ऐवजी विशेष संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा घेण्याबाबत निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. परीक्षांसाठी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘प्रोमार्क’ला देण्यात आली. ऑनलाईन प्रश्नपत्रिकादेखील तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र परीक्षा नेमकी कशी असेल, विद्यार्थ्यांना कुठे परीक्षा देता येईल, ‘ऑनलाईन’ परीक्षा देण्यात अडचणी आल्या तर काय इत्यादी प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहेत. महाविद्यालयांनादेखील यासंदर्भात कल्पना नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा विद्यापीठाकडे लागल्या आहेत. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.