मोफत धान्य कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:12+5:302021-05-05T04:14:12+5:30
कळमेश्वर : राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना गरीब नागरिकांना तीन किलो गहू, दोन किलो तांदुळ मोफत देण्याची घोषणा केली ...
कळमेश्वर : राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना गरीब नागरिकांना तीन किलो गहू, दोन किलो तांदुळ मोफत देण्याची घोषणा केली होती. कळमेश्वर तालुक्यातील १२ हजार शिधापत्रिकाधारक यासाठी पात्र आहेत. मात्र नागरिक मोफत धान्याच्या माहितीसाठी भागातील रेशन दुकाने आणि पुरवठा कार्यालयात चकरा मारत आहेत. पण धान्याचा पुरवठा वेळेत केला नसल्याने वितरणाला विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले मोफत धान्य कुठे आहे, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात गरीब नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने ५,४७६ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यासाठी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अंत्योदय व प्राधान्य अशा १२ हजार शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या काळासाठी मदत जाहीर केली होती, त्या कालावधीमध्ये नागरिकांची उपासमार होताना दिसत आहे.
-
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांना जगणे मुश्कील होत आहे. राज्य सरकारने जे धान्य सर्वसामान्यांना देण्याची तजवीज केली आहे, ते तातडीने देण्यात यावे, तरच योजनेचा उद्देश सफल होईल.
- अरुण वाहने, सामाजिक कार्यकर्ते, कळमेश्वर