'सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं? राजकारण करु नये, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:04 PM2019-12-16T16:04:58+5:302019-12-16T16:05:35+5:30

सावरकरांच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सभागृहात शिवसेना आमदार शांत बसले होते.

'Where and where is Savarkar?' Bachchu Kadu reprimands BJP MLA | 'सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं? राजकारण करु नये, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे'

'सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं? राजकारण करु नये, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे'

googlenewsNext

मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन गोंधळ निर्माण झाला. भाजपाआमदारांनी मी सावरकर असं लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करुन सरकारचा निषेध नोंदवला.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आम्ही सभागृहात काढलेले गौरवोद्गार आज विधिमंडळ कामकाजातून काढून टाकले. त्यामुळे हे सभागृह भारताचे की ब्रिटिशांच्या विधानसभेचे, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मात्र, राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरुन झालेल्या राजकारणावर आमदारबच्चू कडू यांनी टोकाची प्रतिक्रिया दिली आहे. 

सावरकरांच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सभागृहात शिवसेना आमदार शांत बसले होते. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असून आम्ही सावरकरांचा अवमान खपवून घेणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. भाजपा आमदारांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सत्ताधारी पक्षाविरुद्ध आवाज उठवला. याबाबत बोलताना, बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले. सध्या, शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पक्ष कुठलाही असू द्यात. भावनेचं धर्माचं राजकारण करुन मतं अधिक पेटीत कसे पक्के होतील, हा खेळ सर्वच पक्षांकडून सुरू आहे. हा खेळ थांबला पाहिजे. मुळात जिथं मरण अटळ आहे, ते मुद्दे समोर घेऊन काम करणे गरजेचं आहे, असे आमदार बच्चू कडूंनी म्हटलंय. 

सावरकर कुठं आणि हे भाजपाचे आमदार कुठं, मी सावरकर लिहिताना थोडी लाज-लज्जा ठेवायला नको का? असा प्रश्नही बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत, त्यामुळे ते वाट्टेल ते बोलतात. बच्चू कडू हे रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे व्यक्ती आहेत, असा टोलाही भाजपा आमदार संजय कुटे यांनी कडूंना लगावला आहे. 

दरम्यान, सावरकर यांच्याबद्दल बोलण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे दैवत आहे. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल. पण, आमच्याकडून त्यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. आमचा संघर्ष आम्ही सभागृहातही चालू ठेवू, प्रसंगी सभागृहाबाहेरही करू. जोपर्यंत राहुल गांधी या देशाची माफी मागत नाही, तोपर्यंत हा संघर्ष अविरत राहील, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: 'Where and where is Savarkar?' Bachchu Kadu reprimands BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.