भंगारातील २० बस गेल्या कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:16 AM2018-07-26T01:16:52+5:302018-07-26T01:18:01+5:30
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.
मागील दहा वर्षापूर्वी महापालिकेने शहर बस सेवा चालविण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी व्हीएनआयएल या खासगी कंपनीकडे सोपविली होती. आॅपरेटरने २३० बसेस सुरू करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकेला मिळालेल्या ३०० बस खासगी आॅपरेटरक डे देण्यात आल्या.अशा प्रकारे शहरात ५३० बस सुरू करण्यात करण्यात येणार होत्या. परिवहन विभागाचा कारभार व्यवस्थित चालावा यांसाठी नागपूर महानगर परिवहन लिमिटेड (एनएमपीएल)ची स्थापना करण्यात आली. मात्र एमएमपीएलला परिवहन विभागाच्या कारभारात सुधारणा करण्यात यश मिळालेले नाही. प्परिणामी नवीन २३० बस भंगारात टाकाव्या लागल्या.
शहर बस सेवेची महापालिकेने जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया १९९४ साली सुरू झाली होती. २००१ ते २००६ या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस सेवेत २०.६८ कोटींचा तोटा झाला होता. याचा भार महापालिकेने स्वीकारावा, अशी मागणी परिवहन विभागाने केली होती. परंतु महापालिकेने नुकसान भरपाई देण्याला विरोध दर्शविला. त्यानतंर २००७ मध्ये महापालिकेला शहर बस सेवा चालविण्याला परवानगी दिली. त्यानुसार १०आॅक्टोबर २००७ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर बस सेवेची जबाबदारी खासगी आॅपरेटरकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २००७ मध्ये महापालिका व व्हीएनआयएल यांच्यात करार झाला होता.
करारानुसार व्हीएनआयएलला २३० बस शहरात सुरू करावयाच्या होत्या. यात १५० मोठ्या तर ८० मिनी बसचा समावेश होता. यातील २०० बस आॅपरेटरने खरेदी करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून ३०० बस महापालिकेला प्राप्त झाल्या. यातील २४० बस आॅपरेटरक डे सोपविण्यात आल्या. ६३.६० कोटीच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा वाटा ५० टक्के, २० टक्के राज्य सरकार तर ३० टक्के वाटा महापालिकेला उचलावयाचा होता. प्रकल्पानुसार ५३० बस शहरात धावणार होत्या. परंतु पूर्ण बस शहरात धावल्याच नाही. यातील २४० बस भंगारात पडून आहेत.
भंगार समितीची आज बैठक
भंगारात पडून असलेल्या २३० बसची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या परिवहन समितीने समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. यात नितीन साठवणे व अर्चना पाठक यांचा समावेश आहे. गुुरुवारी समितीची बैठक आयोजित केली आहे. यात भंगार बसचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रवीण भिसीकर यांनी दिली.
जबाबदार कोण ?
परिवहन विभागाच्या खापरी व हिंगणा येथील डेपोमध्ये भंगारातील बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. असे असूनही बसचे स्पेअरपार्ट, टायर चोरीला गेले आहे. एवढेच नव्हेतर काही गाड्यांना इंजिनही नाही. यात महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.