नववीची पुस्तके अडली कुठे?
By admin | Published: June 26, 2017 01:46 AM2017-06-26T01:46:26+5:302017-06-26T01:46:26+5:30
यावर्षी नवव्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे शहरात नववीच्या पुस्तकांचे शॉर्टेज भासत आहे.
पालक-विद्यार्थी त्रस्त : केंद्र म्हणतेय फक्त विज्ञानाचे शॉर्टेज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी नवव्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे शहरात नववीच्या पुस्तकांचे शॉर्टेज भासत आहे. २७ जूनपासून विदर्भातील सर्व शाळा सुरू होत असताना, अद्यापही ७५ टक्के पुस्तके पोहचलेली नाहीत. परंतु बालभारतीच्या नागपूर पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे फक्त विज्ञानाच्या पुस्तकांचे शॉर्टेज असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व माध्यमाची पुस्तके वितरकांना उपलब्ध करून दिली आहेत. परंतु शालेय पुस्तकांच्या बाजारपेठेत फेरफटका मारला असता, नववीच्या पुस्तकांसाठी पालकांसह विद्यार्थी भटकंती करताना दिसताहेत.
शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेत्यांकडे सध्या नववीची पुस्तके घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व पालकांना परत जावे लागत आहे. बहुतांश नामांकित पुस्तक विक्रेत्यांकडे नववीच्या मराठी माध्यमाचा विज्ञान विषय सोडल्यास सर्वच पुस्तके उपलब्ध आहे. परंतु नववीच्या हायर इंग्लिश मीडियमच्या केवळ तीन पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमाची उर्वरित पुस्तके अद्यापही विक्रेत्यांकडे पोहचलेली नाहीत. त्यामुळे सेमी इंग्लिश व हायर इंग्लिशमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमाची काहीतरी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मात्र हिंदी माध्यमाचे एकही पुस्तक बाजारात उपलब्ध नाही.
विज्ञान सोडल्यास एकाही पुस्तकाचा शॉर्टेज नाही
पुस्तकांच्या शॉर्टेज संदर्भात बालभारतीच्या नागपूर पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्राकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, केवळ विज्ञानाची पुस्तके उपलब्ध नाहीत. आम्ही ५० हजार पुस्तकांची प्रिंट मागविली आहे. या आठवड्याभरात विज्ञानाची पुस्तके विक्रेत्यांकडे उपलब्ध होऊन जातील. उर्वरित पुस्तके आम्ही मुख्य वितरकांकडे उपलब्ध केली आहे. विज्ञान सोडल्यास एकाही पुस्तकाचा शॉर्टेज नाही.
७५ टक्के पुस्तक ांचे शॉर्टेज
पुस्तक विक्रेते हरीश राठी यांनी सांगितले की, मराठी माध्यम सोडल्यास इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या पुस्तकांचे शॉर्टेज आहे. शासनाकडून पुस्तके कधी मिळतील अद्यापही सांगता येत नाही. नागपूर शहरात अद्यापपर्यंत २५ टक्के तरी पुस्तके उपलब्ध झाली आहे. पश्चिम विदर्भात तर यापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे.