‘त्या’ तंटामुक्त गाव समित्या आहेत तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:40+5:302021-08-12T04:12:40+5:30

शरद मिरे भिवापूर : गावातील भांडणांचा गावातच निपटारा व्हावा यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट ...

Where are the 'those' dispute free village committees? | ‘त्या’ तंटामुक्त गाव समित्या आहेत तरी कुठे?

‘त्या’ तंटामुक्त गाव समित्या आहेत तरी कुठे?

Next

शरद मिरे

भिवापूर : गावातील भांडणांचा गावातच निपटारा व्हावा यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ रोजी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ अभियान राज्यभरात सुरू केले. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त गाव समित्यांची उभारणी झाली. गावातील तंटे गावातच निकाली निघू लागल्याने पोलिसांवरील ताण कमी होऊ लागला. मात्र, ‌‌हे महत्त्वाकांक्षी अभियान थांबले आहे. तंटामुक्त समित्या कुठे गायब तर कुठे निष्क्रिय झाल्यात. त्यांची नोंदसुद्धा प्रशासनाकडे नाही.

१५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झालेले तंटामुक्त अभियान २०१४-१५ पर्यंत उत्तमरित्या चालले. तंटामुक्त गावांना शासनाकडून पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक समितीची पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात नोंद असायची. समितीच्या बैठका सुध्दा नियमित व्हायच्या. मात्र, २०१५ पासून शासन आणि प्रशासनाचे तंटामुक्त अभियानाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तंटामुक्त अभियान आता केवळ नावापुरते मर्यादित आहे. त्यांच्या नोंदी, कार्याचा लेखाजोखा प्रशासनाकडे नाही. भिवापूर तालुक्यात १३७ गावे असून ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांशी गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. कुठे सक्रियरित्या काम सुरू आहे तर काही ठिकाणी केवळ नावच शिल्लक आहे. त्यांना शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शन मिळत नाही. सक्रिय समित्यांची नावेसुध्दा प्रशासनाकडे नाहीत.

तंटे पोहोचतात पोलीस ठाण्यात

प्रशासनाच्या दफ्तरी तंटामुक्त समित्यांचे महत्त्वच कमी झाल्यामुळे गावातही त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे लहान-मोठे तंटे आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचायला लागले आहेत. ‘आबां’च्या काळात तंटामुक्तीसाठी धडपडणारी गावे आता तंटायुक्त म्हणून ओळखली जावी. हे अभियानाचे नव्हे तर शासनाचे दुर्दैव आहे.

नक्षी येथील समिती सक्रिय

तालुक्यातील नक्षी येथे तंटामुक्त समितीचे कार्य चांगले आहे. येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, वाद विवाद, तंटे असल्यास समितीला अर्ज करावा लागतो. त्यानंतर समिती दोन्ही पक्षकारांना बोलावून सामंजस्याने ही प्रकरणे सोडवितात. मात्र, त्यानंतरही समाधान न झाल्यास पोलीस स्टेशनचे दार ठोठावावे लागत असल्याचे सांगितले. मालेवाडा, चिचाळा येथे सुध्दा समिती सक्रिय आहे.

अध्यक्षांची निवड नियमित

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती होते. शासन व प्रशासनाकडे या समित्यांची सध्या नोंद नसली तरी, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बहुतांश ग्रामपंचायतीत आजही सुरू आहे. नियुक्ती झाल्यानंतर मात्र प्रशासनाकडून कुठल्याही मार्गदर्शक सूचना मिळत नसल्यामुळे समिती केवळ गावापुरती आणि नावापुरती उभी असते.

---

तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून सहा महिन्यांपूर्वी माझी निवड झाली. तेव्हापासून गावात अंतर्गत भांडणे निकाली काढण्याचे काम यथोचित सुरू आहे. मात्र, शासन व प्रशासनाकडून आम्हांला कुठल्याही मार्गदर्शक सूचना मिळत नाहीत. बैठका सुध्दा होत नाही.

- देविदास भजभूजे, अध्यक्ष तंटामुक्त समिती, मालेवाडा

Web Title: Where are the 'those' dispute free village committees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.