कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा?

By admin | Published: February 24, 2016 03:19 AM2016-02-24T03:19:30+5:302016-02-24T03:19:30+5:30

सध्याचे सरकार स्मार्ट सिटी, मेट्रो आणि उड्डाणपुलाबाबतच बोलत आहे. त्यातही काहीही होताना दिसत नाही. मूलभूत गरजांकडे शासनाचे लक्ष नाही.

Where are you going to take my Maharashtra? | कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा?

कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा?

Next

अमित देशमुख यांचा सवाल :
विलासराव देशमुख मित्र परिवारातर्फे स्नेहमिलन

नागपूर : सध्याचे सरकार स्मार्ट सिटी, मेट्रो आणि उड्डाणपुलाबाबतच बोलत आहे. त्यातही काहीही होताना दिसत नाही. मूलभूत गरजांकडे शासनाचे लक्ष नाही. हाताला कामच नसेल तर लोक घराबाहेर पडून मेट्रोने कुठे जातील? शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भासह मराठवाडा आणि आता पश्चिम महाराष्ट्रातही होत आहेत. निवडणुकीच्या काळात ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’अशी जाहिरात होती. आता शासनाला ‘कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा’ असे विचारण्याची वेळ आली आहे, असे विधान अमित विलासराव देशमुख यांनी केले.
विलासराव देशमुख मित्र परिवाराच्यावतीने स्नेहमिलन आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ, आग्याराम देवी चौक येथे करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. उल्हासदादा पवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, यादवराव देवगडे, वसंतराव इटकेलवार, राजेंद्र काळमेघ, राजेश कडू, शेख हुसेन, हरिभाऊ नाईक, अभिजित वंजारी, अ‍ॅड. सुरेश राजूरकर, कृपाल भोयर, मुकुंद पन्नासे उपस्थित होते. अमित देशमुख म्हणाले, विलासरावांवर तुम्ही जीवापाड प्रेम केले, ते प्रेम मी अनुभवत आहे, त्यामुळेच मलाही त्यांचा अभिमान वाटतो. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. आपला विचार ठामपणे बोलता येत नाही. पण विलासरावांनी संताच्या विचारानेच सर्वधर्मसमभाव ठेवत कार्य केले. अच्छे दिनची प्रतीक्षा करताना हाती काहीच लागले नाही. त्यामुळेच आज ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ची चर्चा जास्त होते आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारीने महाराष्ट्र ढवळून निघाला, राज्यात दुष्काळ पडला आहे, पण अच्छे दिनचे स्वप्न दाखविण्यात येत आहे. महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राजधानी करायचे आहे का? असा सवाल करीत विलासरावांच्या काळात ७० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली.
आजही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, वीज बिल माफ करा अशी मागणी होते आहे, पण त्याची चर्चा होत नाही. आपले पंतप्रधान देशात राहतच नाही तर या देशाचे काय होणार? त्यामुळेच महाराष्ट्राची नव्याने बांधणी करायला आणि आपल्याला भेटायला मी आलो आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी उल्हासदादा पवार यांनी विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणींना उजाळा देताना त्यांचे व्यक्तिमत्त्व समजावून सांगितले.
याप्रसंगी अमित देशमुख यांच्या हस्ते विलासराव देशमुख यांच्याशी स्नेह असणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात मुकुंदराव पन्नासे, माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, हरिभाऊ केदार, प्राचार्य बबनराव तायवाडे, देवराव रडके, हरिभाऊ नाईक, विनोद सोमकुंवर, वसंत इटकेलवार, के. के. पांडे, यादवराव देवगडे, मा. म. गडकरी, केशवराव शिंदे, बाबुराव झाडे, रामदास गेंदरे, रामगोविंद खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

अनुपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांची चर्चा
काँग्रेस पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी आणि पक्षाला बळ प्राप्त करून देण्यासाठी अमित देशमुख यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पण या कार्यक्रमाला नागपुरातील दिग्गज काँग्रेस नेते मात्र अनुपस्थित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज होतीच. त्याची कुणकुण अमित देशमुखांना लागली. त्यामुळे भाषणातून त्यांनी उपस्थित नेत्यांपेक्षा अनुपस्थितांची चर्चा करू नका. आपल्याला वाद घालायचा नाही संवाद साधायचा आहे, असे सांगितले. याशिवाय मी केवळ आपणा सर्वांना भेटायला आलो आहे. पक्षाला बळकट करण्याचे आवाहन करायला आलो आहे. त्यामुळे याशिवाय माझ्या भेटीचा अर्थ शोधण्यात काहीही अर्थ नाही, असे अमित देशमुख म्हणाले.

Web Title: Where are you going to take my Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.