लसीचा दुसरा डोज मिळणार कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:47+5:302021-07-12T04:06:47+5:30
नागपूर : ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोज घेतला. त्यांना दुसऱ्या डोजसाठी मात्र भटकंती करावी लागत आहे. शहरात सुरू असलेल्या ...
नागपूर : ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोज घेतला. त्यांना दुसऱ्या डोजसाठी मात्र भटकंती करावी लागत आहे. शहरात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर केवळ पहिलाच डोज दिला जात असल्याने, दुसऱ्या डोजसाठी नागरिकांची केंद्राकेंद्रावर भटकंती सुरू आहे. त्यातच दुसऱ्या डोजची मुदत संपत आल्याने त्यांचे टेन्शनसुद्धा वाढले आहे. दुसऱ्या डोजच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आहे. आम्ही शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात लस घेण्यास जायला तयार आहे, पण दुसरा डोज नेमका कोणत्या केंद्रावर मिळेल, असा सवाल काही नागरिकांनी लोकमतकडे केला आहे.
जुना सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी रंजना देशपांडे यांनी ६ एप्रिलला पहिला डोज घेतला. त्यांना दुसऱ्या डोजची तारीख २९ जून देण्यात आली. पण दुसरा डोज उपलब्धच होत नसल्याची त्यांची ओरड आहे. त्यांना मोबाईलवर मॅसेज येतात, पण केंद्र निश्चित सांगण्यात येत नाही. त्या लसीकरण केंद्रावर विचारणा करण्यास जातात तर तिथे पहिल्या डोजचे लसीकरण सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात येते. त्यांच्या दुसऱ्या डोजच्या लसीची अखेरची तारीख २७ जुलैपर्यंत असल्याने, त्यांचा वैताग वाढला आहे. अशा अनेक नागरिकांकडून लोकमतला विचारणा होत आहे.
महापालिकेकडून लसीकरण मोहिमेच्या दिलेल्या माहितीनुसार कोव्हीशिल्ड लस १४५ केंद्रावर सुरू आहे. त्यासाठी केंद्रावर ऑनलाईन, ऑफलाईन नोंदणी करता येईल. तर कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्यामागे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे, त्यांना दुसरा डोज दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. पण कुठे असे स्पष्ट केले नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहे.