मनपाचे बेंच गेले कुठे ?

By admin | Published: August 22, 2015 03:07 AM2015-08-22T03:07:42+5:302015-08-22T03:07:42+5:30

उद्यान वा सार्वजनिक स्थळी वॉर्डातील नागरिकांना बसण्यासाठी मनपाने खरेदी केलेल्या तीन आसन क्षमतेच्या लोखंडी आणि सिमेंट बेंचचा गैरवापर होत असल्याची बाब पुढे आली आहे.

Where did the bench go? | मनपाचे बेंच गेले कुठे ?

मनपाचे बेंच गेले कुठे ?

Next

नागपूर : उद्यान वा सार्वजनिक स्थळी वॉर्डातील नागरिकांना बसण्यासाठी मनपाने खरेदी केलेल्या तीन आसन क्षमतेच्या लोखंडी आणि सिमेंट बेंचचा गैरवापर होत असल्याची बाब पुढे आली आहे. त्या-त्या झोनच्या प्रभागातील नगरसेवकांनी कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार बेंचचे वाटप केल्यामुळे मनपाचे बेंच गेले कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खरेदीवर प्रश्नचिन्ह
मनपाच्या एकूण १० झोनपैकी सतरंजीपुरा, लकडगंज, लक्ष्मीनगर आणि गांधीबाग-महाल या चार झोनमध्ये २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांत जवळपास ९० लाख ६७ हजार रुपये किमतीचे तीन आसनी १२०९ लोखंडी बेंच आणि २५ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सिमेंट बेंच अर्थात १ कोटी १६ लाख रुपयांची बेंच खरेदी मनपाच्या त्या-त्या झोनच्या अधिकाऱ्यांनी केल्याची बाब अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या केंद्रीय सहसचिव संध्या माहूरकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात उघड झाली आहे. तीन वर्षांत लोखंडी आणि सिमेंटचे १८४६ बेंच गेले कुठे, असा नागरिकांचा सवाल आहे. तर दरवर्षी होणारी बेंचची खरेदी ही बाबसुद्धा शंकांना खतपाणी घालणारी आहे.
नगरसेवकांनी शहानिशा करावी
बेंचचा उपयोग उद्यान वा सार्वजनिक स्थळी करण्यात यावा, असा नियम आहे. पण हे बेंच कुठे बसविले आहेत, याची आकडेवारी काही वगळता बहुतांश नगरसेवकांकडे उपलब्ध नाही. कार्यकर्त्यांना बेंच दिले म्हणून आपले काम संपले, असे त्यांना म्हणता येणार नाही. त्याचा उपयोग होतो वा नाही, याची शहानिशा नगरसेवकांनी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे केंद्रीय महासचिव देवेंद्र तिवारी आणि शहर अध्यक्ष ज्ञानदेव गोळे यांनी लोकमतशी बोलताना केली.प्राप्त माहितीनुसार सतरंजीपुरा झोनमध्ये २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांत २९० लोखंडी तर ४७ सिमेंट बेंच खरेदी केले. यासाठी मनपाला २३ लाख ६३ हजार रुपये मोजावे लागले. याशिवाय लक्ष्मीनगर झोनमध्ये २०१३-१४ या वर्षांत ३ लाख ३० हजार रुपयांचे ४४ लोखंडी बेंच तर गांधीबाग-महाल झोनमध्ये २०१४-१५ या आर्थिक वर्षांत ९ लाख ८० हजार रुपये किमतीचे १२० लोखंडी आणि २० सिमेंट बेंच खरेदी केले. सर्वाधिक खरेदी लकडगंज झोनमध्ये करण्यात आली. २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांत जवळपास ८० लाख रुपये मोजून ७५५ लोखंडी आणि ५७० सिमेंट बेंच खरेदी केले. चारही झोनमध्ये बेंच मोठ्या प्रमाणात खरेदी केले, पण त्या बेंचचा हिशेब सध्या नगरसेवकांकडे नसल्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षांत होणारी बेंचची खरेदी वादात सापडू शकते, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Web Title: Where did the bench go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.