विस्तार अधिकाऱ्यांनी कुठे टाकला ध्वजदिन निधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:59+5:302020-12-13T04:24:59+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून संकलित करण्यात आलेला ध्वजनिधी २००३ पासून जमाच केला नाही. ही जबाबदारी सांभाळायला कुणीही ...
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून संकलित करण्यात आलेला ध्वजनिधी २००३ पासून जमाच केला नाही. ही जबाबदारी सांभाळायला कुणीही तयार नाही, या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली. २०१८ पर्यंत ज्या विस्तार अधिकाऱ्याने या ध्वजनिधीचे कामकाज बघितले, त्यांची बदली झाली आहे. त्यांना शिक्षण विभागाने यासंदर्भात जाब विचारला आहे.
ध्वजनिधीची जबाबदारी असलेल्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संगीता तभाने यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या खुलाश्यात स्पष्ट केले की ध्वजनिधी संकलित करून ती जमा करण्याची जबाबदारी प्रत्येक विस्तार अधिकाऱ्याची होती. २००२ पासून ध्वजनिधी जमा केला नसला तरी, तभाने यांच्याकडे हा चार्ज २०१० पासून आला. त्यांनी कामाचा व्याप लक्षात घेता, लिपिकाकडे त्याची जबाबदारी सोपविली. २०१४ नंतर लिपिकाच्या माध्यमातून हे काम करण्यात आले. त्यांनी स्पष्ट केले की, ध्वजनिधीचे साहित्य आल्यानंतर १३ पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना वाटप केले. निधी संकलित करून तो विस्तार अधिकाऱ्यांना परस्पर जमा करायचा होता. परंतु विस्तार अधिकाऱ्यांनी निधी जमा केला नाही. २०१८ मध्ये तभाने यांची रामटेक पं.स.मध्ये बदली झाली. त्यांना ही जबाबदारी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कोकोडे यांना सोपविण्याचे आदेश दिले. परंतु त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नाही. या विषयावर कोकोडे यांनी नंतर चर्चाही केली नाही.
त्यांनी स्पष्ट केले की, २० वर्षापासून ध्वजनिधीचे साहित्य विस्तार अधिकाऱ्यांनी स्वीकारून पैशाचा भरणा केलेला नाही. साहित्य आणि पैसा हा जिल्हा सैनिक कार्यालयाकडे भरावा लागतो. त्यामुळे हा निधी माझ्याकडे नाही.
- तर निधी गेला कुठे?
२० वर्षापासून ध्वजनिधी जमा केला नसल्याचा खुलासा तभाने यांनी शिक्षण विभागापुढे केला. त्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना ध्वजनिधीचे साहित्य दिले. पण विस्तार अधिकाऱ्यांनी ते साहित्य स्वत:कडे ठेवले, निधी संकलित केला की नाही, हे माहीत नाही. विशेष म्हणजे दरम्यानचे काही विस्तार अधिकारी बदलून गेले आहे तर काही निवृत्तही झाले आहे.
- जिल्हा परिषदेवरही ३० लाख थकीत
जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेने २०१६ मध्ये ३ लाख ४५ हजार, २०१७ मध्ये १४ लाख व २०१८ मध्ये १२ लाख ७५ हजार रुपयांचा ध्वजनिधी जमा केला नाही. याचीही जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही.