जय गेला कुठे ?

By admin | Published: July 17, 2016 01:44 AM2016-07-17T01:44:45+5:302016-07-17T01:44:45+5:30

त्याचा तो रुबाब, डौलदार शरीर आणि ऐटदार चाल. यामुळे पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील...

Where did Jai go? | जय गेला कुठे ?

जय गेला कुठे ?

Next

वन विभागाची शोधाशोध : रेडिओ कॉलर ‘फेल’
नागपूर : त्याचा तो रुबाब, डौलदार शरीर आणि ऐटदार चाल. यामुळे पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ हा वाघ अचानक गायब झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवाय संपूर्ण वन विभाग अस्वस्थ झाला आहे. विशेष म्हणजे, हा वाघ मागील काही वर्षांपासून या अभयारण्याची खास ओळख बनला होता. जंगलात ‘जय’चे दर्शन होताच पर्यटकही समाधान व्यक्त करीत होते. तो अल्पावधीतच राज्यभरात प्रसिद्ध झाला होता.

त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या या अभयारण्यात रांगा लागत होत्या. एवढेच नव्हे, तर मुंबई-पुण्यावरून व्हीव्हीआयपी सुद्धा त्याला पाहण्यासाठी येथे येत होते. अशाप्रकारे ‘जय’ हा मागील तीन वर्षांत वाघांमधील ‘हिरो’ झाला होता. यातूनच वन विभागासमोर त्याच्या सुरक्षेचे एक आव्हान उभे ठाकले होते. त्यामुळे ‘जय’वर २४ तास नजर ठेवता यावी यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने १५ सप्टेंबर २०१५ रोजी लाखो रुपये खर्च करून, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या मदतीने ‘जय’ला रेडिओ कॉलर लावली. मात्र दोनच महिन्यात म्हणजे, २५ नोव्हेंबर २०१५ रोजी ती रेडिओ कॉलर बंद पडली.
यानंतर १८ मार्च २०१६ रोजी त्याला पुन्हा दुसरी नवीन रेडिओ कॉलर लावण्यात आली. परंतु अवघ्या महिनाभरात ती सुद्धा बंद पडली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, तो याच काळापासून अचानक गायब झाला. काही जाणकारांच्या मते, ८ मे २०१६ रोजी तो ब्रम्हपुरी येथील जंगलात आढळून आला. परंतु त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही.
वन विभाग त्याचा कसून शोध घेत आहे. त्याचवेळी वन विभागातील काही अधिकारी उमरेड-कऱ्हांडला या जंगलात वाघांची (नर) संख्या वाढल्याने ‘जय’ने आपल्या नवीन अधिवासाच्या शोधात हे जंगल सोडल्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. परंतु त्याचवेळी काही जाणकार ‘जय’ हा एवढ्या सहजासहजी आपले जंगल सोडून दुसरीकडे जाणारा प्राणी नाही, असा दावा करीत आहे. त्यामुळे ‘जय’सोबत काही घातपात तर झाला नाही ना! अशी भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

घातपाताची भीती
वन विभागाने ‘जय’ला दोनदा रेडिओ कॉलर लावली. पण ती दोन्ही वेळा बंद पडली. यावर वन विभागाने त्या दोन्ही रेडिओ कॉलर बंद का पडल्या याचा शोध घेऊन पुढील उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु संबंधित वन अधिकाऱ्यांकडून तसे कोणतेही प्रयत्न झालेले दिसून येत नाही. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत पर्यटकांमध्ये ‘जय’विषयी जेवढे आकर्षण वाढले होते, तेवढाच या जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये त्याच्याविरुद्ध रोष भडकला होता. त्यामुळे ‘जय’ची सुरक्षा ही वन विभागापुढील एक आव्हान होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. संबंधित वन अधिकारी तो उमरेड-कऱ्हांडला सोडून गेल्याचा दावा करीत असले, तरी त्याच्याविरुद्ध परिसरातील लोकांच्या मनातील रोष पाहता, ‘जय’सोबत घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक
‘जय’ निघून गेला
‘जय’ हा मागील २०१३ दरम्यान नागझिरा येथून उमरेड-कऱ्हांडला जंगलात आला होता. मात्र तेव्हापासून तो सतत आत-बाहेर होत होता. महिन्यातील १५ दिवस तो ब्रम्हपुरी जंगलात जायचा. शिवाय २०१३-१४ पर्यत येथे त्याच्या तोडीला एकही वाघ (नर) नव्हता. त्यामुळे तो खुलेआम सहज वावरत होता. परंतु गत दोन वर्षांत येथे नवीन सात वाघ तयार झाले आहे. त्यामुळे एवढ्या वाघांना उमरेड-कऱ्हांडला जंगालचे क्षेत्र कमी पडत आहे. यातूनच ‘जय’ हा नवीन अधिवासाच्या शोधात निघून गेला आहे. विशेष म्हणजे, या जंगलात केवळ दोन वाघांच्या (नर) अधिवासाएवढेच वनक्षेत्र आहे. त्यामुळे भविष्यात येथील पुन्हा काही वाघ बाहेर जाऊ शकतात. ‘जय’ हा इतर दुसऱ्या वाघांच्या तुलनेत अधिक जनावरांची शिकार करीत होता, हे खरं आहे. मात्र यातून त्याच्यासोबत घातपात झाला असावा, असे वाटत नाही.
-एम.एस. रेड्डी, क्षेत्र संचालक-पेंच व्याघ्र प्रकल्प.

Web Title: Where did Jai go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.