गेला बिबट्या कुणीकडे? ना पगमार्क, ना कॅमेऱ्यात फोटो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:07+5:302021-06-04T04:07:07+5:30
नागपूर : महाराजबागनंतर बुधवारी रात्री जुन्या हायकोर्टाच्या इमारतीकडे व सायंकाळी उशिरा जीपीओ चौकाकडे जाताना दिसल्याची माहिती मिळालेला बिबट्याचा बराच ...
नागपूर : महाराजबागनंतर बुधवारी रात्री जुन्या हायकोर्टाच्या इमारतीकडे व सायंकाळी उशिरा जीपीओ चौकाकडे जाताना दिसल्याची माहिती मिळालेला बिबट्याचा बराच शोध घेऊनही सापडला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या वन विभागावर आता ‘गेला बिबट्या कुणीकडे?’ असे पालुपद आळवण्याची वेळ आली आहे.
बिबट्याच्या शोधासाठी बुधवारी दुपारी शहरातील नाल्यांचा २० ते २२ किलोमीटरचा परिसर आणि सायंकाळी पीकेव्हीचा परिसर शोधण्यात आला होता. पीकेव्ही कर्मचारी वसाहतीलगत एक पिंजराही लावण्यात आला होता. दरम्यान, अंकित नामक एका व्यक्तीने बुधवारी रात्री बिबट्याला आपण जुन्या न्यायालयाच्या इमारत परिसरात जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे गुरुवारी सकाळी रेस्क्यू पथकासह हिंगणा आणि सेमिनरी हिल्स येथील पथकाने या परिसराची पाहणी केली. स्टेफीनेही परिसरात शोध घेतला. मात्र बिबट्याचा पत्ता लागला नाही. त्याचे पगमार्कही या परिसरात मिळाले नाही. या इमारतीलगत असलेल्या सर्वच शासकीय कार्यालयातील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली. मात्र तो कुठेच आढळला नाही.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी एका महिलेने बिबट्याला जीपीओ चौकातून जाताना पाहिल्याचे पोलीस कंट्रोल रूमला फोन करून सांगितले. त्यानंतर जवळच असलेल्या वन पथकाने चौकाच्या परिसरात त्याचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्याचा शोध लागलाच नाही किंवा कुठेच पगमार्कही मिळाले नाही, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
...
बिबट्या नेमका कुठे?
आठवडाभरापासून वन विभागाला गुंगारा देणारा बिबट्या नेमका कोणत्या परिसरात असावा, याचा अंदाज प्रत्यक्ष वन विभागालाही आलेला नाही. अंधारात चाचपडावे, तशी अवस्था सध्या वन विभागाची दिसत आहे. भरवस्तीमध्ये उपराजधानीत बिबट्या फिरत असतानाही त्याचा माग काढू न शकल्याने वन विभागावर नामुष्कीची पाळी आली आहे. आता अगदी मुख्यमंत्री निवासस्थान, हैदराबाद हाऊस परिसराजवळ तो पोहचल्यासारखी स्थिती आहे. जुने न्यायालय, जीपीओ चौकात आपण खुद्द बिबट्याला पाहिल्याचा दावा नागरिकांकडून होत आहे, गायत्रीनगरात दोन नागरिकांनी त्याला पाहिले, एका सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो कैद झाला. कंपनीत काम करणाऱ्या चौकीदारानेही त्याला प्रत्यक्ष पाहिले. महाराजबागजवळ शिकार केलेले डुक्कर आणि पगमार्कही आढळले. असे असताना आता त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
...
अधिकारी गंभीर
आठवडा लोटूनही बिबट्या सापडत नसल्याने वन विभागाचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. अनेक ठिकाणी पिंजरे आणि कॅमेरे ट्रॅप लावूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. एका ठिकाणाहून गेल्यावर तो पुन्हा तिथे फिरकला नाही. यामुळे पिंजरे आणि कॅमेरे लावण्याचे परिश्रम व्यर्थ ठरले. अद्याप कुण्या माणसावर हल्ला झालेला नाही, यावरच सध्या वन विभाग समाधान मानताना दिसत आहे.
...