मनी आॅर्डर गेली कुठे ?
By admin | Published: November 28, 2014 01:00 AM2014-11-28T01:00:18+5:302014-11-28T01:00:18+5:30
वीज बिल भरण्यासाठी एक हजार रुपयांची मनी आॅर्डर पाठवून १८ दिवस होऊनही गंतव्य ठिकाणी पोहचली नाही. मनी आॅर्डर पाठविणारा मुलगा व वाट पाहणारे वडील दोघेही पोस्टाच्या अजब कारभाराचे बळी पडले आहे.
वीज बिलासाठी पाठविलेल्या मनी आॅर्डरचा पत्ता मिळेना
नागपूर : वीज बिल भरण्यासाठी एक हजार रुपयांची मनी आॅर्डर पाठवून १८ दिवस होऊनही गंतव्य ठिकाणी पोहचली नाही. मनी आॅर्डर पाठविणारा मुलगा व वाट पाहणारे वडील दोघेही पोस्टाच्या अजब कारभाराचे बळी पडले आहे. पाठविलेल्या मनी आॅर्डरची चौकशी कुठे करावी असा प्रश्न मुलाला पडला आहे.
वाठोडा येथे राहणारे अनिल आनलवार यांनी १० नोव्हेंबर रोजी वडील मधुकर आनलवार (मु.पो. गोवर्धन ता. मूल) यांना नागपुरातील नंदनवन पोस्ट कार्यालयातून वीज बिल भरण्यासाठी हजार रुपयांचा मनी आॅर्डर केला. मनी आॅर्डर पाठविल्याची रसीद त्यांना देण्यात आली. वडिलांना मनी आॅर्डर केल्याची माहिती फोनवरून दिली. दहा दिवस झाल्यावरही मनी आॅर्डर मिळाली नसल्याने वडिलांची चिंता वाढली.
यासंदर्भात वडिलांनी गोवर्धन पोस्टात चौकशी केली. मात्र त्यांच्या नावे काहीच आले नसल्याचे सांगितले. माहिती मिळताच अनिलने नंदनवन पोस्टात चौकशी केली. त्यांना बेंबाळा ब्रांच पोस्ट कार्यालयात मनी आॅर्डर पोहचल्याचे सांगण्यात आले. बेंबाळा पोस्टात चौकशीअंती सिस्टम खराब असून मनीआॅर्डर पोहचलाच नाही असे सांगितले. अनिल यांना नंदनवन पोस्टातून योग्य माहिती मिळत नाही. त्यांना बेंबाळा पोस्टात जाऊन चौकशी करा असे सांगण्यात येत आहे.
१८ दिवसानंतरही मनी आॅर्डर वडिलांपर्यंत पोहचली नाही अन् मुलालाही परत मिळाही नाही यामुळे पैसे गेले कुठे असा प्रश्न पडला आहे. वीज बिल भरण्यासाठी पाठविलेले पैसे वेळेत मिळाले नाही तर वीज कापली जाऊ शकते याची चिंता बाप-लेकांना पडली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी गिरीपेठ पोस्ट कार्यालयात जाणार असल्याचे अनिल आनलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)