चिमुकलीचे आई-वडील गेले कुठे ?
By Admin | Published: July 28, 2016 02:27 AM2016-07-28T02:27:49+5:302016-07-28T02:27:49+5:30
मातृत्व सुखापासून वंचित असलेल्या एका महिलेने स्वत:ला संपविल्याची हृदयविदारक घटना मंगळवारी घडली आणि त्याच दिवशी स्वत:च्या पोटच्या गोळ्याला सोडून...
नागपूर : मातृत्व सुखापासून वंचित असलेल्या एका महिलेने स्वत:ला संपविल्याची हृदयविदारक घटना मंगळवारी घडली आणि त्याच दिवशी स्वत:च्या पोटच्या गोळ्याला सोडून मायबापाने पलायन केल्याची बाब उघडकीस आली. या दोन्ही घटना मानवाच्या भावनिकतेवर आघात करणाऱ्या आहेत. एकीकडे मातृत्वाची लालसा आत्महत्येसाठी प्रवृत्त करते, दुसरीकडे मातृत्व शाप ठरल्यागत, वागणूक एका चिमुकल्या जीवाला मिळत आहे.
नागपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी एक महिला पोलीस कर्मचारी आली. ही महिला पोलीस नरखेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याचे तिने सांगितले. तिच्या सोबत एक वर्षाची चिमुकलीही होती. या महिला पोलिसाने सांगितलेली चिमुकलीची हकीकत मनाला अस्वस्थ करणारी होती. या चिमुकलीला तिच्या आईवडिलांनी नरखेड तालुक्यातील पिपळा (के) ग्रामपंचायतमध्ये मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सोडून गेल्याचे महिला पोलिसाने सांगितले. ग्रामस्थांनी आईवडिलांचा भरपूर शोध घेतल्यानंतर दुपारच्या सुमारास नरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. नरखेड पोलिसांनीही आईवडिलांचा शोध घेतला, परंतु त्यांच्या कुठेच पत्ता न लागल्याने, त्यांनी या मुलीला अनाथालयात हलविण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याकडे आणले. संरक्षण अधिकाऱ्यांनी तिला शहरातील एका अनाथालयात ठेवले असून, गुरुवारी बाल कल्याण समितीपुढे तिला सादर करण्यात येणार आहे.
मुलांना वाऱ्यावर सोडणे ही क्रू रता
मुलांना वाऱ्यावर सोडणे ही गंभीर बाब असून, बाल संरक्षण अधिनियम २०१५ अन्वये आई-वडिलांना शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे हातून घडलेली चूक सुधारायची असेल तर आईवडिलांपुढे एक संधी आहे. त्यांनी तत्काळ दखल घ्यावी, संरक्षण कार्यालयापुढे त्यांचे समुपदेशन करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी केले आहे.