‘त्या’ वर्गखोल्या गेल्या कुठे?
By admin | Published: December 28, 2015 03:35 AM2015-12-28T03:35:30+5:302015-12-28T03:35:30+5:30
मौदा तालुक्यातील धर्मापुरी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवरगाव (देवी) येथे एक आणि पिंपळगाव गटग्रामपंचायत अंतर्गत ...
प्रशासनात खळबळ : नवरगाव व पिंपळगाव येथील प्रकार
अशोक हटवार कोदामेंढी
मौदा तालुक्यातील धर्मापुरी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवरगाव (देवी) येथे एक आणि पिंपळगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुरमाडी येथील दोन अशा तीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी देत निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. वर्षभरानंतरही या तिन्ही वर्गखोल्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. या वर्गखोल्यांसाठी देण्यात आलेला निधी कुठे आहे, हेदीखील पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे या वर्गखोल्या नेमक्या गेल्या तरी कुठे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
नवरगाव (देवी) आणि मुरमाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्याने या दोन्ही गावांमध्ये अनुक्र मे एक व दोन अशा तीन वर्गखोल्यांची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली होती. गावात वर्गखोल्यांच्या बांधकामाला मागणी करूनही मंजुरी देण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष होता. दरम्यान २२ मे २०१५ रोजी मौदा पंचायत समिती कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नवरगाव येथील नरेश बाबूलाल बावनकुळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले. त्यांनी या वर्गखोल्यांच्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता, पालकमंत्र्यांनी सदर बांधकाम तत्काळ करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे यांना लगेच दिले. तसेच नरेश बावनकुळे यांना पत्राद्वारे कळविण्यात आले.
पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांनी हाच मुद्दा पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित केला. मात्र, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे खंडविकास अधिकारी चिंधू आदमने यांना विचारणा करण्यात आली. त्यावर या वर्गखोल्या व त्याच्या निधीचा शोध घेण्याचे आश्वासन आदमने यांनी लोकप्रतिनिधींना दिले.
या वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली होती. तसा प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाने मौदा येथील गट साधन केंद्राला पाठविला होता. सोबत स्टॅम्प पेपरवर करारनामा, शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव व आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आली होती. या वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले होते. शिवाय, कार्यवाहीच्या अहवालाची मागणीही केली होती. दरम्यान, दुसऱ्या क्षेत्रातील वर्गखोल्या दाखवून निधी हडपण्यात आला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.