बापरे, झाडावर माेठ्या संख्येने हे किटक आले कुठून?
By निशांत वानखेडे | Published: October 12, 2023 07:10 PM2023-10-12T19:10:17+5:302023-10-12T19:12:32+5:30
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी ताे ‘स्टींग बग’ असल्याचे स्पष्ट केले.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून काही झाडांवर लाखाेंच्या संख्येने किटक दिसून येत आहेत. अगदी लाखाेंच्या समुहाने ते झाडाच्या खाेडाला चिकटून आहेत. किटकांच्या जवळ गेल्यावर घाण दुर्गंधीही येते व स्पर्श केल्यास हाताला लाल रंग लागताे. मानवासाठी व झाडांसाठी हानीकारक तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगेजवळील बिहाडीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील वर्गाला लागून असलेल्या टिपरींच्या झाडावर गेल्या अनेक दिवसापासून ही किटके मुळापासून तर शेंड्यापर्यंत असंख्य प्रमाणात असल्याची माहिती स्थानिक पर्यावरण प्रेमी प्रवीण कडू यांनी दिली आहे. चार-पाच दिवसापासून कडक ऊन तापायला लागल्यानंतर ही किटके झाडाच्या फांद्यांवरून वर्गामध्ये शिरत आहेत. यांना असह्य असा उग्र वास येताे. हातात धरल्यास हात लाल होतो आणि रंग सहजासहजी जात नाही. हा कीटक एका शिक्षकाच्या मानेला चावल्यानंतर दोन दिवसांपासून इंजेक्शन टाेचल्यासारख्या वेदना होत असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळेतील बालकांच्या दृष्टीनेही धाेकादायक असल्याने लाेकांमध्ये भीती आहे. नागपुरातही काही झाडांवर हे किटक दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते हवामानात बदल झाल्याने त्यांचा प्रदुर्भाव वाढला आहे.
हा ‘स्टींग बग’, धाेकादायक नाही
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी ताे ‘स्टींग बग’ असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या ओटीपोटातील ग्रंथीमधून स्कंक, सिलॅन्ट्राे आणि अमोनियाचे मिश्रण असलेला तीव्र गंध साेडतात. हा किटक चावल्याने हलक्या वेदना हाेतात. एखाद्या झाडाजवळ थंडावा असेल व झाडाचा गंध त्यांना आवडला तर ते माेठ्या संख्येने जमा हाेतात. मात्र हा किटक मानवासाठी किंवा झाडांसाठीही हानीकारक किंवा धाेकादायक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्लाेराेपायरीफासची पावडर फवारल्यास मरतात
बाजारात ‘क्लाेराेपायरीफास’ची पावडर किंवा द्रावण या किटकांवर फवारल्यास त्यांचा नायनाट हाेता असल्याचे डाॅ. दवणे यांनी स्पष्ट केले. २० मि.ली. द्रव १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास स्टींग बग नाहीशे हाेतात. मात्र फवारणी करताना डाेळ्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. किटक चावल्याने वेदना अधिक हाेत असतील तर डाॅक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले.