जलयुक्त शिवारचा २० हजार कोटींचा निधी गेला कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:17 PM2019-05-13T12:17:25+5:302019-05-13T12:19:04+5:30
राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या १५ ते २० वर्षात पडला नाही असा भीषण दुष्काळ आहे. राज्यातील २२ जिल्ह्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई व गुरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धरणे कोरडी पडली, विहिरी व बोरवेल आटल्या. भूगर्भातील पाण्याची पातळी दिड ते दोन हजार फुटावर गेली आहे. लोकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. मग शासनाने जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केलेला निधी गेला कुठे असा सवाल करून विधीमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी जलयुक्त शिवारमुळे नेमका कोणता लाभ झाला. याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली.
विदर्भातील दुष्काळग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ अमरावती व नागपूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. सोमवारपासून या दौºयाला सुरूवात केली आहे. दौºयावर रवाना होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार लोकमतशी बोलत होते.
बुलडाणा जिल्ह्यातील ८५ टक्के गावे टंचाईग्रस्त आहेत. जून महिन्यात या जिल्ह्यातील शंभरटक्के गावे टंचाईग्रस्त होतील अशी परिस्थिती आहे. अशी गंभीर परिस्थिती असूनही शासनाने दुष्काळ निवारणासाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत की जिथे बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. बाब इतकी गंभीर आहे की त्या गावांमध्ये साधी नळयोजना सुद्धा नाही.जलव्यवस्थापनाची कोणतीही प्रभावी कामे जिल्ह्यात केली गेली नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भूगर्भ जलपातळी खूप खालावली आहे. विहिरी, कूपनलिका तसेच तलाव सर्वकाही कोरडे पडले आहेत . दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ . यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करू. बुलडाणा प्रमाणेच विदभार्तील सहा जिल्ह्यातील परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी व गुरांसाठी चारा छावण्याची तातडीने व्यवस्था करण्याची गरज आहे. परंतु सरकार दुष्काळाबाबत गंभीर दिसत नाही. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौºयानंतर मागणी केल्यानुसार सरकारने उपाययोजना केल्या नाही तर काँग्रेस तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर तीव्र आंदोलन उभारून सरकारला तातडीने उपाययोजना करण्यास भाग पाडू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.