कुठे आहे ‘डिजिटल’ भाजप ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:53+5:302021-07-23T04:06:53+5:30
योगेश पांडे नागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शहर भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे. शिवाय मागील अनेक ...
योगेश पांडे
नागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शहर भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे. शिवाय मागील अनेक वर्षांपासून भाजपकडून ‘डिजिटल इंडिया’वर भर देण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांपासून विविध नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असलेल्या शहर भाजपमध्ये प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आहे. जगापर्यंत शहर भाजपची इत्यंभूत माहिती पोहोचावी यासाठी साधे संकेतस्थळदेखील कार्यरत नसल्याची बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तीनच वर्षांअगोदर संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याकडे कुणी लक्षच दिले नाही.
भाजपचे नेते, कार्यकर्ते सोशल माध्यमांवर सक्रिय असतात. राष्ट्रीय व प्रदेश पातळीवर भाजपची स्वतंत्र संकेतस्थळे आहेत. या माध्यमातून पक्षाशी संबंधित विविध उपक्रम, माहिती जगापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आहेत. सोबतच पक्षातील विविध मोर्चे, आघाड्या, पदाधिकारी यांची माहितीदेखील त्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. २०१४ सालापासून भाजपसाठी नागपूर हे महत्त्वाचे शहर राहिले आहे. सद्य:स्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा व विधानपरिषदेतील आमदार, शंभराहून अधिक नगरसेवक यांच्यामुळे भाजपचे विविध उपक्रम सुरूच असतात. पक्षाचे धोरण लक्षात घेता सर्व माहिती एकाच ठिकाणी संकलित असणे अपेक्षित आहे. मात्र, संकेतस्थळ कार्यरतच नसल्याने पक्षातील कार्यकर्तेदेखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दोन वेळा झाले होते उद्घाटन
भाजपचे संकेतस्थळ तयार करण्यासाठी २०१७ मध्ये पावले उचलण्यात आली होती. संकेतस्थळाचे दोनदा उद्घाटनदेखील झाले होते. मात्र प्रत्यक्षात आता हे संकेतस्थळ अस्तित्वातच नसल्याचे चित्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे डोमेन कधीच एक्स्पायर झाले आहे. शहर भाजपमधील ‘सोशल मीडिया टीम’ सक्रिय असतानादेखील हे चित्र आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पदाधिकारीच उदासीन
केवळ ‘सोशल मीडिया’ वापरणे म्हणजेच तुम्ही ‘डिजिटल’ झाले असे होत नाही. पक्षाची ध्येय-धोरणे, इतिहास, शहरातील आतापर्यंतची कामगिरी याची नेमकी व अचूक माहिती एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. काही सदस्य नेत्यांसोबतची छायाचित्रे टाकण्यावर धन्यता मानतात. मात्र, वैयक्तिकपणे सक्रियता दाखवत असताना पक्ष म्हणून एकत्रितपणे ‘डिजिटल’ माध्यमातून जगापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेण्याची तसदी घेण्याची आवश्यकता पडली नाही का, असा प्रश्न कार्यकारिणीतीलच एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला.