कुठे साचली घाण, तर कुठे लागले कुलूप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:03+5:302021-08-27T04:13:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घरोघरीच नाही, तर सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे उभारली आहेत. झोपडपट्टी भागातही कम्युनिटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घरोघरीच नाही, तर सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे उभारली आहेत. झोपडपट्टी भागातही कम्युनिटी शौचालयांची व्यवस्था आहे. मात्र, त्याचे मेंटेनन्स करण्याचे महानगर पालिका विसरली आहे. अनेक स्वच्छतागृहांमध्ये घाण साचल्याने ते आता वापराच्या लायकीचे राहिलेले नाहीत, तर अनेक ठिकाणी कुलूप लागले असल्याची अवस्था आज आहे.
शहरातील झोपडपट्टी परिसरात ४६ कम्युनिटी शौचालये आणि ७६ सार्वजनिक शौचालये आहेत. रोटरी क्लबकडून बनविलेली १५ सार्वजनिक शाैचालयेही आहेत. या सर्वांच्या देखभालीची जबाबदारी मनपाकडे असली तरी देखभालीचा विसर पडल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी घाण साचली आहे. सार्वजनिक शौचालयांना कुलूप लागले आहे. बाजार आणि बसस्थानक परिसरातील शौचालये तर अस्वच्छतेमुळे उपयोगाची राहिली नाहीत. नाइलाजाने उघड्यावर जावे लागते. मेंटेनन्ससाठी खासगी कंपनीकडे जबाबदारी असल्याचे सांगून मनपाचे अधिकारी यातून अंग काढत आहेत.
...
स्वच्छता ‘पे अँड यूज’ शौचालयांचीच
मनपाकडून ६८ सुलभ शौचालय दिले असून, येथे पे अँड यूज पद्धत आहे. फक्त तिथेच स्वच्छता दिसते. मनपाकडून कंत्राटातून ३० वर्षांसाठी शौचालयांच्या देखभालीची जबाबदारी दिली आहे.
...
सार्वजनिक शौचालयांची स्वच्छताच नाही
बस स्थानक, बाजार परिसर, सिताबर्डी, इतवारी, रहाटे कॉलनी, इमामवाडा रोड, आदी ठिकाणी शौचालये असली तरी स्वच्छ नाहीत. रोटरी क्लबने बनविलेल्या १५ सार्वजनिक शौचालयांमधील अनेकांची दुरवस्था आहे. अस्वच्छता एवढी की नागरिक त्याचा वापरच टाळतात. मनपाच्या ७६ सार्वजनिक शाैचालयांची परिस्थितीही अशीच आहे.
...
कोट
मनपाने सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीची व स्वच्छतेची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे आहे. आधी तिथे दोन वेळा स्वच्छता व्हायची. अलीकडेच झालेल्या बैठकीनंतर दिवसातून तीनदा स्वच्छता करण्याच्या सूचना आहेत. यापुढे अस्वच्छता आढळल्यास कारवाई करू.
- राजेश भगत, आरोग्य अधिकारी, मनपा
...
कोट
देखरेखीअभावी अनेक सार्वजनिक शाैचालयांना कुलूप लागले आहेत. ज्या कंपन्यांना काम सोपवले, त्या जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडत नाहीत. आमच्याकडे फक्त शहरातील शाैचालयांची माहिती आहे.
- डाॅ. गजेंद्र महल्ले, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी
...