स्कूल बसेसचे घाेडे अडले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:44+5:302021-02-05T04:38:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : तालुक्यात सुमारे ११५ शाळा आहेत. यात महाविद्यालयाची आणखी भर पडते. १० महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुक्यात सुमारे ११५ शाळा आहेत. यात महाविद्यालयाची आणखी भर पडते. १० महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर शासनाने शाळा पूर्ववत सुरू केल्या आहे. परंतु शाळेतील स्कूल बसेस अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून, स्कूल बसेसचे घाेडे अडले कुठे, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
काेराेना काळात शाळांना स्कूल बसेसचे मेंटेनन्स जमले नाही. सध्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे स्कूल बसेसचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न संस्थाचालकांसमाेर आहे. या बसेसला आरटीओ पासिंग करणे गरजेचे आहे. काेराेना काळात फी न भरण्याचे शासनाचे आदेश हाेते. त्यानुसार पालकांनी फी भरली नाही. यामुळे खासगी शाळांचे बजेट काेलमडले आहे. विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांची घडी विस्कटली आहे. निधी गाेळा झाला नाही. त्यात कमी विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसेस चालविणे शक्य नाही, याचा फटका गाेरगरीब विद्यार्थ्यांना बसत आहे.
स्कूल बसेसअभावी खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. ही समस्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अधिक जाणवते. याकडे संबंधित अधिकारी व शासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी पालकांची आहे. यासंदर्भात एका इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिकेशी चर्चा केली असता, पालक फी भरत नसल्याने बसेस सुरू करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे यांना विचारणा केली असता, सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसेस सुरू केल्या नाही. यातून संसर्गाची अधिक शक्यता आहे, असेही ते म्हणाले.