तस्करीतील १० कासव कुठे सोडणार ? वन विभागासमोर पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:00 PM2019-07-12T22:00:27+5:302019-07-12T22:02:06+5:30
गांधीबागच्या अग्रसेन चौकातून मागील शुक्रवारी दोन आरोपींकडून जप्त केलेले १० कासव कुठे सोडावेत, असा प्रश्न नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ‘रुफ टर्टल’नावाचे कासव अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधीबागच्या अग्रसेन चौकातून मागील शुक्रवारी दोन आरोपींकडून जप्त केलेले १० कासव कुठे सोडावेत, असा प्रश्न नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ‘रुफ टर्टल’नावाचे कासव अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहेत.
वन्यजीव नियमानुसार सूचित असलेल्या कासवांना त्यांच्या मूळ अधिवासात किंवा त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या वातावरणातील भागात असलेली नदी अथवा पाण्याच्या भागात सोडण्यात येते. त्यामुळे या ‘रुफ टर्टल’ कासवांना कुठे सोडावे यासाठी वन विभाग लखनौच्या टॉरटाईज हॅबिटेट सेंटरला सल्ला मागत आहे. परंतु स्थानिक वन अधिकाऱ्यांना लखनौ सेंटरकडून वन विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार आता स्थानिक अधिकारी वन मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढील कारवाई करीत आहेत. वन विभागाच्या चमूने आणि स्वयंसेवी संस्थेच्या माहितीवरून शुक्रवार ५ जुलैला रात्री गांधीबागच्या अग्रसेन चौकात १० कासवांसह दोन आरोपी ऋषिकेश प्रदीप जाधव (२०) व आशिष खोब्रागडे (२५) रा. पिंपरी, कन्हान यांना अटक केली होती. परंतु दोन्ही आरोपींनी तस्करीत तिसरा आरोपी अक्षयची मुख्य भुमिका असल्याचे सांगितले. तिसरा आरोपी अक्षय फरार असून आठवडाभरापासून वन विभागाची चमू त्याचा शोध घेत आहे.