माॅडर्न फूड पार्क, ऑरेंज उन्नती प्रकल्प गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 08:00 AM2022-11-26T08:00:00+5:302022-11-26T08:00:06+5:30
Nagpur News सन २०१६ मध्ये नागपूर शहरातील मिहानमध्ये पतंजलीचा माॅडर्न फूड पार्क आणि ठाणाठुनी (ता. माेर्शी, जि. अमरावती) येथे ऑरेंज उन्नती या संत्रा प्रक्रिया प्रकल्पांची मुहूर्तमेढ राेवण्यात आली. मात्र या दोन्ही प्रकल्पांचे काम अद्यापी सुरूच झालेले नाही.
सुनील चरपे
नागपूर : नागपुरी संत्रा टेबल फ्रुट असल्याने ग्राहक माेठ्या आकाराची संत्री खाण्यासाठी खरेदी करतात. छाेट्या आकाराची संत्री प्रक्रिया करण्यासाठी वापरावी लागते. या छाेट्या संत्र्यांची समस्या निकाली काढण्यासाठी सन २०१६ मध्ये नागपूर शहरातील मिहानमध्ये पतंजलीचा माॅडर्न फूड पार्क आणि ठाणाठुनी (ता. माेर्शी, जि. अमरावती) येथे जॅन फार्म फ्रेशच्या ऑरेंज उन्नती या संत्रा प्रक्रिया प्रकल्पांची मुहूर्तमेढ राेवण्यात आली. या सहा वर्षात दाेन्ही प्रकल्पांचे काम शून्य आहे.
छाेट्या संत्र्यामुळे माेठ्या संत्र्याला कमी दर मिळतात. ग्रेडिंग केल्यास छाेटा संत्रा विकायचा कुणाला, असा प्रश्न निर्माण हाेता. छाेटा संत्रा प्रक्रिया करण्यासाठी वापरला जाताे. प्रक्रिया उद्याेग नसल्याने छाेटा संत्रा फेकावा लागताे, नाही तर माेठ्या संत्र्यासाेबत कमी दरात विकून आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ही समस्या साेडविण्यासाठी नागपुरातील ‘नाेगा’ व नांदेड येथील पेप्सीको ऑरेंज प्रोसेसिंग प्लांट सुरू करण्यात आले. नाेगाची संत्रा क्रशिंग क्षमता व पेप्सीकाेचा संत्रा वाहतूक खर्च लक्षात घेता ही समस्या सुटली नाही.
पतंजली आयुर्वेदच्या ‘माॅडर्न फूड पार्क’चे मिहान, नागपूर येथे ३१ ऑगस्ट २०१६ आणि जैन फार्म फ्रेश फूड व हिंदुस्थान काेला काेला बेव्हरेजच्या ‘ऑरेंज उन्नती’ या प्रकल्पाची ३० डिसेंबर २०१६ राेजी ठाणठुनी, ता. माेर्शी, जिल्हा अमरावती येथे मुहूर्तमेढ राेवली गेली. परंतु, या दाेन्ही प्रकल्पात सहा वर्षात एकही संत्रा अथवा माेसंबी ‘क्रश’ केला नाही. त्यामुळे ऐरणीवर असलेली संत्रा प्रक्रिया समस्या साेडविण्याऐवजी त्याचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याने संत्रा व माेसंबी उत्पादकांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मल्टिलाइन प्लांट बंद
एमआयडीसीने काटाेल, जिल्हा नागपूर येथे फेब्रुवारी १९९७ मध्ये मल्टिलाइन प्लांट सुरू केला. त्यानंतर पणन महासंघाने कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा व माेर्शी, जिल्हा अमरावती येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले. काटाेलचा प्रकल्प मे २०२१ पासून बंद आहे. कारंजा (घाडगे) व माेर्शी येथील बंद असलेले प्रकल्प महाऑरेंजने चालवायला घेतले असून, त्यात केवळ ग्रेडिंग, व्हॅस काेटिंग व पॅकिंगची कामे केली जातात.
वायनरी व इतर उद्याेगांना वाव
वाइन ही दारू (लिकर) नसून, फर्मेंटेड फ्रुट ज्यूस हाेय. संत्र्यापासून उत्कृष्ट वाइन तयार हाेत असल्याने विदर्भात संत्रा वायनरी व लिक्युअर तसेच ज्यूस, ज्यूस काॅन्सेंट्रेट, पल्प, मार्मालेड, स्काॅश आणि संत्र्याच्या सालीपासून ऑइल, काॅस्मेटिक, शाम्पू, पशुखाद्य उत्पादने तयार हाेत असल्याने या उद्याेगांना माेठा वाव आहे. संत्र्यातील पाेषक घटक त्याच्या वाइन व लिक्युअरमध्ये येतात.
संत्र्याचे दर काेसळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. दाेन्ही प्रकल्प सुरू असते तर दर काेसळले नसते. संत्र्यावर आधारित वायनरीसह इतर उत्पादनांचे प्रकल्प सुरू करायला पाहिजे. सरकारने याला प्राेत्साहन द्यायला हवे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.