कुठे गेले परीक्षांचे वेळापत्रक?
By admin | Published: November 13, 2014 12:57 AM2014-11-13T00:57:27+5:302014-11-13T00:57:27+5:30
सातत्याने बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हलगर्जीपणाचे आणखी एक उदाहरण सादर केले आहे. प्राध्यापकांवर वचक आणू न शकल्याने प्रश्नपत्रिकाच
नागपूर विद्यापीठ : अधिसूचनेत लिहून संकेतस्थळावर परीक्षांचे नवीन वेळापत्रक नाहीच
नागपूर : सातत्याने बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हलगर्जीपणाचे आणखी एक उदाहरण सादर केले आहे. प्राध्यापकांवर वचक आणू न शकल्याने प्रश्नपत्रिकाच ‘सेट’ झाल्या नाही. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याची अखेर विद्यापीठाने घोषणा केली. परंतु अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे बुधवारी रात्रीपर्यंत नवीन वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणखी वाढीस लागला आहे.
विधानसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना यंदा १० दिवस उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरित परीक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी गंभीरतेने प्रयत्न होणे आवश्यक होते. परीक्षा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे प्राध्यापकांकडे लक्षच राहिले नाही अन् वेळेत प्रश्नपत्रिका ‘सेट’ झाल्याच नाहीत. नवीन परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर वेळापत्रक, इतर परीक्षा या बाबी मार्गी लावल्यानंतर हा मुद्दा त्यांच्या लक्षात आला. परंतु उशीर झाला असल्यामुळे नाईलाजाने ‘सीबीएस’ (क्रेडीट बेस सिस्टीम)पद्धतीच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागल्या.
‘लोकमत’ने ही बाब प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठाने यासंदर्भात संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली. नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे असे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कुठल्याही परीक्षेचे नवीन वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर दिसतच नसल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. विद्यापीठातील अधिकारी दिवसभर परीक्षा यंत्रणेच्या कामात व्यस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
जगाच्या मागे असणारे संकेतस्थळ
नागपूर विद्यापीठाचे संकेतस्थळ हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनदेखील प्रचंड प्रमाणात हलगर्जीपणा करत येत असल्याचा आरोप विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. परीक्षा विभागाने परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्याची अधिसूचना १० नोव्हेंबर रोजी काढली होती. परंतु संकेतस्थळावर मात्र १२ नोव्हेंबर रोजी ही अधिसूचना ‘अपलोड’ करण्यात आली. त्याअगोदर प्रसिद्धीमाध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पोहोचली होती. दरवेळीच विद्यापीठाचे संकेतस्थळ माहिती देण्यात मागे असते. एकीकडे ‘आयटी रिफॉर्म्स’चे मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाकडून याची दखल घेण्यात यावी व संकेतस्थळ सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्राध्यापक-प्रशासन ‘आमने-सामने’
दरम्यान, परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्याप्रकरणी प्राध्यापक व विद्यापीठ प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवित आहे. आम्ही वेळेत विद्यापीठाला प्रश्नपत्रिका दिल्या होत्या. मग आमच्यावर आरोप का लावण्यात येत आहेत, असा प्रश्न अनेक प्राध्यापकांनी उपस्थित केला. परीक्षांची कामे वेळेवर होत आहेत की नाही हे पाहणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. प्राध्यापकांवर खापर फोडणे चुकीचे आहे, असे मत ‘नूटा’चे (नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन) सचिव डॉ.अनिल ढगे यांनी व्यक्त केले. संबंधित मुद्दा १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता आहे.