शिक्षणाला कुठे आले वयाचे बंधन : वयाच्या ७८ व्या वर्षी मिळविली २४ वी पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 09:02 PM2020-02-17T21:02:26+5:302020-02-17T21:05:41+5:30
चक्क वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील त्यांच्यातील शिक्षणाचा उत्साह कायम असून, सोमवारी त्यांनी आयुष्यातील २४ वी पदवी प्राप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण म्हटले की त्यात परिश्रम, समर्पण अन् सतत काहीतरी नवीन मिळविण्याचा शोध या गोष्टी येतातच.जी व्यक्ती संकल्प करून प्रामाणिकपणे शिक्षणाच्या प्रवाहात चालते तिच्यासाठी विद्या ग्रहण करणे ही एक साधनाच असते. सर्वसाधारणत: निवृत्ती झाल्यानंतर सुखासमाधानाने व आरामात आयुष्य जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र सेवानिवृत्तीनंतरदेखील त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. ज्ञान हेच मनुष्याचे शाश्वत धन आहे हाच विचार नेहमी डोक्यात ठेवला व अव्याहतपणे विद्येची साधना सुरूच ठेवली. चक्क वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील त्यांच्यातील शिक्षणाचा उत्साह कायम असून, सोमवारी त्यांनी आयुष्यातील २४ वी पदवी प्राप्त केली. दिगंबर महादेव आळशी असे या ‘तरुण’ विद्यार्थ्यांचे नाव असून, आता पदव्यांचे पाव शतक पूर्ण करायच्या तयारीत ते लागले आहे.
दिगंबर आळशी यांनी ‘बीई’ पदवी पूर्ण केली व त्यानंतर ते ‘जीईसी’मध्ये नोकरीला लागले. परंतु आयुष्यात स्थिरस्थावर झाले म्हणून त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून विविध पदव्यांचा अभ्यास केला. यात पत्रकारिता, ‘एलएलएम’, एमबीए’, ‘एमसीजे’, ‘एम.एस.’, ’एम.ए.’ (लोकप्रशासन, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, भाषा, अर्वाचीन भारतीय इतिहास-पुरातत्त्वशास्त्र, मानसशास्त्र) इत्यादींचा समावेश होता. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी नोकरी व शिक्षण दोन्ही गोष्टी सुरूच ठेवल्या. ‘जीईसी’चे महाव्यवस्थापक म्हणून ते निवृत्त झाले. परंतु शिक्षण ग्रहण करणे त्यांनी सोडले नाही. त्यानंतरही त्यांनी अनेक पदवी व पदविका अभ्यासक्रमांचा अभ्यास केला. विविध प्रकारच्या २३ पदव्या मिळविल्यानंतर ‘इग्नू’त (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) त्यांनी ‘पी.जी.डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस ऑपरेशन्स’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. नियमितपणे अभ्यास करून त्यांनी यातदेखील यश मिळविले. सोमवारी ‘इग्नू’च्या दीक्षांत समारंभात त्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
आता ‘पीएचडी’चा संकल्प
समाजात वावरताना लोक अनेकदा हताश झालेले दिसून येतात. परंतु प्रत्यक्षात शिक्षणातून हताशपणा अन् दु:ख दूर होऊ शकते. शिक्षणाला वयाचे बंधन नसते आणि आयुष्यभर शिकण्याची प्रक्रिया ही सुरूच असते हाच विचार मी नेहमी डोक्यात ठेवला. आता मी पंचविसाव्या अभ्यासक्रमाला ‘इग्नू’तच प्रवेश घेतला आहे व ‘पीएचडी’ करण्याचादेखील संकल्प आहे, अशी भावना दिगंबर आळशी यांनी व्यक्त केली.