मान्सून रुसला कुठे? नागपुरात २१४.८ मिमी पावसाचीच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:45 AM2019-07-15T11:45:32+5:302019-07-15T11:45:58+5:30
जून महिन्यात मान्सूनने दगा दिला. जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिन्यात मान्सूनने दगा दिला. जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. भर पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या दिवसात दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.
नागपूर शहर व ग्रामीण भागात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. परंतु यंदा मान्सून रुसून बसला आहे. १ जूनपासून आतापर्यंत २१४.८ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. साधारणपणे या एकाच महिन्यात सरासरी ३०० मि.मी. इतका पाऊस पडत असतो. बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात पाऊस पडतो. परंतु सध्या पावसासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत नाही.
अशावेळी येणाºया दिवसात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. विदर्भात १४ जुलैपर्यंत सरासरी ३०३.५ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु यावर्षी २१२.१ मि.मी. इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. जी साधारणपणे ३० टक्के कमी आहे. तसेच मराठवाड्यात सरासरी २१०.५ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु आतापर्यंत केवळ १४४.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जी सरासरीपेक्ष ३१ टक्के कमी आहे.
राज्यातील इतर भागांमध्ये मात्र मान्सूनची विशेष मेहरबानी दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात ससरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पाऊस झाला. येथे २६३.० मि.मी. पाऊस होतो. यावर्षी आतापर्यंत ३०१.५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. कोकण आणि गोवा येथे सरासरी ११५८.५ मि.मी. इतका पाऊस होता. यावर्षी सरासरी पेक्षा २० टक्के अधिक म्हणजेच १३९२.१ मि.मी. इतक्या पावसाची नोंद केली.
शेजारील राज्याची स्थिती चांगली
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या शेजारील राज्यातील स्थिती चांगली आहे. पश्चिम मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. पूर्व मध्य प्रदेशात मात्र सरासरीपेक्षा ६ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम मध्य प्रदेशात २६७.७ आणि पूर्व मध्य प्रदेशात २७०.१ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. येथे सरासरी २२१.५ आणि २८४.४ मि.मी. इतका पाऊस होत असतो.
छत्तीसगडमध्ये यंदा सर्वात अगोदर मान्सून दाखल झाला होता. परंतु येथे सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. येथे सरासरीपेक्षा ३५५.८ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु आतापर्यंत ३०९.२ मि.मी. इतक्या पावसाचीच नोंद करण्यात आलेली आहे.
विदर्भात नागपूर सर्वाधिक उष्ण
सलग दुसऱ्या दिवशीही नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण राहिले. दुपारी ४ नंतर १५ मिनिट चांगला पाऊस झाला. परंतु तो समाधानकारक राहिला नाही. रविवारी कडक उन्हामुळे तापमान ३७.१ डिग्री सेल्सिअस इतके राहिले. ते सरासरीपेक्षा ५ डिग्री अधिक होते. वर्धेत कमाल तापमान ३६.५ डिग्री, ब्रह्मपुरीमध्ये ३६.४ डिग्री, अकोला ३६.१, चंद्रपूरमध्ये ३६ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.