'जिथे आमचा उमेदवार कमजोर, तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी लढणार; उद्धव ठाकरेंनी मोठेपणा दाखविला'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:25 PM2023-05-31T12:25:00+5:302023-05-31T12:25:50+5:30
कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला पराभवाची धुळ चाखावी लागणार - विनायक राऊत
नागपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, माजी आमदार आणि काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. गेल्या 30 वर्षापासून धानोरकर यांचे आमच्याशी नाते आहे. त्यांचा आजाराने निधन झाले हे न पचणारे दुःख आहे. कुटुंबियांना या संकटातून बाहेर पडण्याच ताकद द्यावी, अशी श्रद्धांजली शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वाहिली आहे. याचबरोबर त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर टीकाही केली आहे.
महाविकास आघाडीची एकच बैठक झाली आहे. शिवसेनेच्या जेवढ्या जागा जिंकून आल्यात त्या ठिकाणी पर्यायी उमेदवार तयार आहे. जेवढ्या जागा आहे तेवढ्या राहिल्या पहिजे शिल्लक जागेवर चर्चा होईल. एक मात्र निश्चित भाजपने कितीही आटापिटा केला तरी मंत्र्यांना प्रचारासाठी गल्ली गल्लीत जाऊन फिरावं लागत आहे. भाजपाने अन्यायकारक निर्णय घेतले, कितीही अध्यादेश बदलले त्याचा फायदा होणार नाही. जे कर्नाटकात झाल ते राजस्थान, महाराष्ट्रात होणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला पराभवाची धुळ चाखावी लागणार, अशी टीका राऊत यांनी केली.
तिन्ही पक्षात 16 /16 चा प्रस्ताव चर्चेला आलेला नाहीय. पुढील चर्चा जुलै महिन्यात होईल. शिवसेनेचे 19 खासदार आहेत. पण आमचा उमेदवार कमजोर असेल आणि महाविकास आघाडीचा ताकदवार उमेदवार असल्यास चर्चा करू, असा उद्धव ठाकरे यांनी मोठेपणा दाखवला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सामंजस्याने एकत्रित उभे राहणार आणि लढणार. भाजपच्या अधोगतीची सुरुवात झाली असल्याचे तावडेंच्या सर्व्हेत दिसून आले आहेच, असे राऊत म्हणाले.
सहकार क्षेत्र भष्ट्राचार मुक्त करण्याची गरज आहे. महाराजांच्या नावाचा उपयोग पक्षासाठी केला नाही, दुर्दैवाने भाजप छत्रपती महाराजांचे नाव वापरत आहे, पुतळे दूर करणारे भाजप आहे, आम्ही अवहेलना करणार नाही. मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही, म्हणून त्यांचा भ्रमनिरास झोला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांचा रूपाने स्फोट झाला, लवकरच येत्या काही दिवसात आणखी स्फोट होतील. शिंदे गटातील अनेक जण संपर्कात आहेत, असा दावा विनायक राऊत यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना कामधंदा नाही म्हणून गप्पा मारायला बसतात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.