ज्या रेस्टॉरंटवर कारवाई केली ते कुठे आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:13 AM2021-02-18T04:13:33+5:302021-02-18T04:13:33+5:30
नागपूर : राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल व बार सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत ...
नागपूर : राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल व बार सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्यामुळे ४३ हॉटेल व बारवर कारवाई केली होती. त्याची यादीही विभागाने जारी केली होती. परंतु या यादीवरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. या यादीत जे नाव लिहिले आहे त्या नावाचे रेस्टॉरंटच सदर परिसरात नाही.
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त रविवारी सदर, अंबाझरी, धंतोली आणि सीताबर्डी परिसरात अनेक हॉटेल, बार आणि आइसक्रीम शॉपच्या संचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस उपायुक्त विनीता शाहु यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. यात सदर परिसरातील अशोका चौक परिसरात चिल्ड गर्ल रेस्टॉरंटचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु या कारवाईची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ‘लोकमत’ने बुधवारी सदर परिसरात या नावाच्या रेस्टॉरंटचा शोध घेतला असता हे रेस्टॉरंटच आढळले नाही. या रेस्टॉरंटचे लोकेशन तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त विनीता शाहु यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु त्यांनी फोन न उचलल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
..............
चुकीने नाव छापले की वाचविण्याचा प्रयत्न?
सदरमधील अशोका चौक परिसरात चिल्ड गर्ल रेस्टॉरंट नावाचे रेस्टॉरंट नाही. परंतु या नावाशी मिळतेजुळते एक रेस्टॉरंट आहे. अशा स्थितीत यादीत असलेले नाव टायपिंग करताना झालेली चूक आहे की संबंधित रेस्टॉरंटला वाचविण्यासाठी मुद्दाम असे करण्यात आले, हा प्रश्न आहे.