सायको लपलाय तरी कुठे?

By admin | Published: February 7, 2017 01:57 AM2017-02-07T01:57:52+5:302017-02-07T01:57:52+5:30

सायको हल्लेखोराच्या संबंधाने सकाळपासून रात्रीपर्यंत अफवांचे बॉम्ब फुटत असल्याने सामान्य नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Where the teacher is still? | सायको लपलाय तरी कुठे?

सायको लपलाय तरी कुठे?

Next

नागरिकांत प्रचंड दहशत : अजनीत पुन्हा कथित हल्ल्याचा प्रयत्न
नागपूर : सायको हल्लेखोराच्या संबंधाने सकाळपासून रात्रीपर्यंत अफवांचे बॉम्ब फुटत असल्याने सामान्य नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभरात सायकोने अजनीतील महिलांवर हल्ला केल्याच्या पाच बातम्या पोलीस आणि पत्रकारांच्या कानावर आल्या. रात्री एक महिला पोलिसांकडे पोहचली. तिने चाकूहल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, आपल्याला तक्रार नोंदवायची नाही, केवळ माहिती द्यायची होती, असे सांगितले. दुसरीकडे सायकोच्या संबंधाने चुकीची माहिती देणारे फोन कॉल्स येत असल्याने पोलिसांची धावपळ वाढली आहे. सायकोच्या दहशतीने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला धडा शिकविण्याची तयारी केल्यामुळे उपराजधानीत नाथजोगी प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची भीती वाढली आहे.
महिनाभरात सायकोने वेगवेगळ्या भागात हल्ला करून महिलांना जखमी केल्याप्रकरणी हुडकेश्वरमध्ये एक, अजनीत दोन आणि सक्करदऱ्यात चार असे एकूण सात गुन्हे दाखल झाले. मात्र, या घटनांच्या किती तरी अधिक पटीने शहरात अशा घटना घडल्याच्या रोज अफवा पसरत आहेत. एकट्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळपासून पाच ठिकाणी सायकोने हल्ला केल्याच्या बातम्या पोलिसांकडे पोहचल्या. कुकडे लेआऊट, त्रिशरण चौक, मानवता स्कूल, तुकडोजी चौक आणि बॅनर्जी लेआऊटमध्ये एका महिलेवर सायकोने चाकूहल्ला केल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्यात कुणी तरी कळविली. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन चौकशी केली. त्यातील श्वेता (वय ४०) नामक महिला तिच्या मामांसह अजनी ठाण्यात पोहचली. दुपारी ३.३० च्या सुमारास आपण अ‍ॅक्टिव्हाने जात असताना बाजूला पल्सरवर एक इसम आला. काळे कपडे आणि हेल्मेट घातलेल्या त्या तरुणाने आपल्यावर चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपण प्रसंगावधान राखल्याने त्याचा वार हुकला आणि चाकू दुचाकीच्या सीटला लागल्यामुळे सीटचे रेक्झिन फाटले. त्यानंतर तो पळून गेला, असे तिने अजनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे अजनीचे द्वितीय पोलीस निरीक्षक पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. आजूबाजूच्या दुकानदारांना विचारणा करण्यात आली. अशी काही घटना आमच्यासमोर घडली नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती तिखट-मीठ लावून इकडेतिकडे देण्यात आल्याने अल्पावधीतच या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी अजनीत पोहचले.
त्यांनीही श्वेतासोबत घडलेल्या घटनेची शहानिशा करून घेतली. दरम्यान, विविध भागात हल्ले झाल्याच्या अफवा सुरूच होत्या. त्यामुळे उपायुक्त परदेसी यांनी तुकडोजी चौकात रात्री ८ वाजता ठिय्या मांडला. तेथून परिमंडळ ४ मधील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यासंबंधाच्या घटनांचा ते आढावा घेऊ लागले.(प्रतिनिधी)

सायको पकडल्याचीही अफवा
सायकोने हल्ला केल्याच्या अफवा पसरत असतानाच सोमवारी रात्री ८ च्या सुमारास व्हॉटस्अ‍ॅपवर सायकोला सक्करदऱ्यात पकडण्यात आल्याची बातमी व्हायरल झाली. त्यात कथित सायकोचा फोटोही होता. त्यामुळे सायकोच्या बातमीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. पोलीस आणि पत्रकारांना ‘सायको पकडला का, कुठे आहे, कसा आहे, कसा पकडला...,’अशाप्रकारचे प्रश्न विचारणारे फोन येऊ लागले. फोन करणाऱ्यांमध्ये महिलांचीही संख्या मोठी होती. पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे शहानिशा केली. त्यानंतर त्याला अद्याप पकडण्यात आले नाही, केवळ अफवा आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट झाले.
पोलिसांची धावपळ वाढली
दररोज होणारे हल्ले आणि सायकोची दहशत वाढतच चालल्याने आता पोलिसांनीही धावपळ वाढविली आहे. रविवारपर्यंत ४० पोलीस अधिकारी आणि १५० पोलीस कर्मचारी सायकोला पकडण्यासाठी धावपळ करीत होते. सोमवारी ही संख्या दुप्पट करण्यात आली. परिमंडळ ४ मधील दोन सहायक पोलीस आयुक्तांसह, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, निरीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी, सर्व बीट मार्शल आणि डीबी पथके, साध्या वेशातील आणि गस्तीवरील पोलीस पथके, खुपिया पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी सायकोचा शोध घेत आहेत. नाकाबंदी करून, सार्वजनिक ठिकाणी सापळे लावून आणि खबऱ्यांच्या माध्यमातून सायकोच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांनी धावपळ वाढविली आहे.

धोका वाढला
सायकोमुळे काळे कपडे आणि हेल्मेट घालून मोटरसायकलवर निघालेले अनेक जण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रस्त्याने जाणारे-येणारेही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत. पोलिसांसोबतच काही ठिकाणी उत्साही तरुणही अशा पेहरावात असलेल्या दुचाकीचालकांना थांबवून विचारपूस करीत आहेत. काही भागातील नागरिक लाठ्या घेऊन सायकोचा बंदोबस्त करण्याची भाषा वापरत असल्याने एखाद्या निष्पाप तरुणाचा बळी जाऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी विविध भागात नागरिकांच्या बैठका घेऊन नागरिकांनी कायदा हाती नये म्हणून समुपदेशन करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
दरम्यान, यापूर्वी सहा घटनांमध्ये सायकोने सायंकाळनंतर हल्ला केला होता. तर, रविवारी रेखा पवार या महिलेने दुपारी १२.४५ तर सोमवारी श्वेता या महिलेने दुपारी ३.३० वाजता हल्ला केल्याची तक्रार नोंदविल्यामुळे सायकोची दहशत तीव्र झाली आहे. अनेक महिला-मुलींनी सकाळ- सायंकाळी फिरायला जाणे बंद केले आहे. पालकही बाहेर पडणाऱ्या मुलींना खबरदारीच्या टिप्स देत आहेत.

Web Title: Where the teacher is still?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.