‘सीसीटीव्ही’तील ‘फुटेज’ गेले कुठे ?

By admin | Published: March 10, 2016 03:31 AM2016-03-10T03:31:33+5:302016-03-10T03:31:33+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागाला सुरुंग लागल्याचे धनादेश ‘रॅकेट’मुळे उघडकीस आले.

Where was the 'footage' of CCTV? | ‘सीसीटीव्ही’तील ‘फुटेज’ गेले कुठे ?

‘सीसीटीव्ही’तील ‘फुटेज’ गेले कुठे ?

Next

विद्यापीठातील धनादेश ‘रॅकेट’ :
वित्त विभागाच्या कारभारातील आणखी एक फोलपणा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागाला सुरुंग लागल्याचे धनादेश ‘रॅकेट’मुळे उघडकीस आले. संबंधित विभागात येऊन तिऱ्हाईत व्यक्ती दुसऱ्याच व्यक्तीचा धनादेश घेऊन गेल्यावरदेखील अधिकाऱ्यांना जाग आली नाही. संबंधित व्यक्ती ‘सीसीटीव्ही’त कैद झाली असण्याची दाट शक्यता असताना ५ फेब्रुवारी अगोदरचे ‘फुटेज’च दिसत नसल्याची बाब समोर आली आहे. खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनीच ही माहिती दिली असून यामुळे वित्त विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या बँक खात्यातून बनावट ‘चेक’च्या माध्यमातून ३१ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आल्याने खळबळ माजली होती. हा प्रकार उघडकीस येऊन अवघे २४ तासदेखील झाले नसताना वित्त विभागातून आणखी दोन धनादेश गायब झाल्याची बाब समोर आली होती. रुपेश रणदिवे या कंत्राटदाराच्या नावाने तयार झालेले २ लाख ३ हजारांचे दोन धनादेश १ फेब्रुवारी रोजी परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीने वित्त विभागातून नेले आणि ते वटविले. याबाबत पोलिसांमध्येदेखील तक्रार करण्यात आली होती.
काही कालावधीपूर्वी नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागांसह वित्त विभागातदेखील ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले होते. यासंदर्भात ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून तपासाला दिशा मिळेल अशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अपेक्षा होती. परंतु नुकत्याच समोर आलेल्या माहितीने अधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.
वित्त विभागातील ‘सीसीटीव्ही’चे ५ फेब्रुवारीनंतरचेच ‘फुटेज’ उपलब्ध आहे. त्याअगोदरचा सर्व ‘डाटा’ दिसत नसल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. नेमका त्याच कालावधीतील ‘फुटेज’ कसे काय गायब झाले हे आश्चर्यचकित करणारे असून यासंदर्भात तांत्रिक मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत मला आत्ताच माहीत पडले असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. केवळ परिसरात ‘सीसीटीव्ही’
नागपूर विद्यापीठाच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लागलेले आहेत. प्रशासकीय इमारती व परीक्षा विभागामध्ये तर कार्यालयांच्या आतदेखील ‘सीसीटीव्ही’ लागलेले आहेत. वित्त विभाग हा विद्यापीठाचा महत्त्वाचा विभाग आहे. असे असताना येथे केवळ प्रवेशद्वाराच्या बोळीमध्ये ‘सीसीटीव्ही’ आहे.
प्रशासनाकडून इतका मोठा हलगर्जीपणा कसा करण्यात आला हा प्रश्नच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यापीठाच्या सर्वच ‘सीसीटीव्ही’चे ‘फुटेज’ हे सहा महिने ते दोन वर्ष या कालावधीपर्यंत सांभाळून ठेवता येते. असे असताना वित्त विभागात नेमका असा कुठला तांत्रिक अडथळा आला हेदेखील एक कोडेच आहे.(प्रतिनिधी)
\
दोन लाख परत मिळणे अशक्य
दरम्यान, विद्यापीठाने या ‘रॅकेट’च्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या वित्तीय समितीची बुधवारी पहिली बैठक झाली. विद्यापीठाचा बनावट धनादेश तयार करून ३१ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली असली तरी हा प्रकार बँकेच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यामुळे ती रक्कम परत करणे ही बँकेची जबाबदारी आहे. परंतु दोन लाख रुपयांचा धनादेश विद्यापीठातून नेण्यात आला होता. त्यामुळे जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत ती रक्कम थेट परत मिळणे अशक्य असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले. समितीला कामकाजाचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शिवाय विद्यापीठाच्या वित्तीय कामकाजात कुठले बदल हवे आहेत, धनादेशांची प्रणाली पूर्णपणे बंद करायची आहे का इत्यादींसंदर्भात सूचना देण्याची विनंती समितीला करण्यात आली असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

Web Title: Where was the 'footage' of CCTV?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.