लढाईच्या काळात कुठे होता ?
By admin | Published: April 23, 2017 03:10 AM2017-04-23T03:10:46+5:302017-04-23T03:10:46+5:30
नागपुरात महापालिकेच्या निवडणुकीत बलाढ्य भाजपाशी टक्कर होती. त्यामुळे पक्षाकडून रसद मिळेल,
संतप्त शिवसैनिकांचा तानाजींना सवाल : चिंतन बैठकीत ‘रसद’ न मिळाल्याची नाराजी
नागपूर : नागपुरात महापालिकेच्या निवडणुकीत बलाढ्य भाजपाशी टक्कर होती. त्यामुळे पक्षाकडून रसद मिळेल, ताकद मिळेल, दिग्गज नेते प्रचारात उतरतील, निवडणूक अंगावर घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, असे काहीच घडले नाही. शिवसैनिक एकट्याच्या बळावर लढला. लढाईच्या काळात आपल्यासह नेते कुठे होते, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांना केला.
महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी गणेशपेठेतील कार्यालयात बैठक घेत चिंतन केले. बैठकीला जिल्हा प्रमुख सतीश हरडे, माजी खासदार व सहसंपर्कप्रमुख प्रकाश जाधव, शेखर सावरबांधे, शहर प्रमुख मंगेश काशीकर, नगरसेवक किशोर कुमेरिया, माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उमेदवारांसह काही पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. या वेळी काहींनी निवडणूक काळात नेत्यांनी उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याची तर काहींनी चुकीच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याची तक्रार केली. पावणेतीन वर्षांपासून पक्षाची कार्यकारिणी नाही. अशात पक्षाचे काम चालणार कसे, असा सवालही काहींनी केला.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आ. सावंत म्हणाले, नागपूरच्या निवडणुकीसाठी दोन खासदार व दोन मंत्र्यांवर जबाबदारी सोपवा. त्यांना नागपुरातून हलू देऊ नका, अशी विनंती आपण पक्षप्रमुखांकडे केली होती. मात्र, निवडणुकीच्या काळात नागपुरात मदतीसाठी कुणीच आले नाही ही वास्तविकता आहे. निवडणुकीच्या १५ दिवसांपूर्वी आपल्यावर संंपर्क प्रमुखाची जबाबदारी आली. निवडणूक काळात पुणे, धारशिव, म्हाडा, पंढरपूर आदी ठिकाणचीही जबाबदारी होती. त्यामुळे नागपूरकडे फारसे लक्ष देता आले नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. दुसरीकडे भाजपामध्ये केंद्रीय नेतृत्वापासून ते बुथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागले होते. शिवसेनेला कुणी वाली नाही. येथे काहीच हालचाली दिसत नाही. हे लक्षात आल्यावर काठावरील मतदार भाजपाकडे वळला व असा निकाल आला.
आपला उमेदवार निवडून येत नाही म्हणून शिवसैनिकाने दुसऱ्याला मतदान करायचे का, असा सवाल करीत अशा गद्दारांची नावे सुचवा मी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतो, असा इशाराही त्यांनी दिला.(प्रतिनिधी)
एबी फॉर्म वेळेत का पोहचले नाहीत?
महापालिकेच्या प्रभागांच्या यादीत पहिल्याच पानावर प्रभाग क्रमाक १ येतो. हा अतिशय महत्त्वाचा प्रभाग असताना येथे शिवसेनेच्या चारही उमेदवारांचे ए-बी फॉर्म वेळेवर का पोहचले नाहीत, असा सवाल प्रभागप्रमुख आशीष घाडगे यांनी केला. या प्रभागात मुख्यमंत्र्यांचे खासमखास विक्की कुकरेजा हे भाजपाकडून मैदानात होते. त्यांना मदत व्हावी म्हणून असे करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित करीत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नितीन सोळंके यांनी चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप केल्याचा आरोप केला. तर सुरेश मटकरी म्हणाले, आपण जुने निष्ठावंत शिवसैनिक असतानाही प्रभाग २ मध्ये आपल्याला डावलून दुसऱ्याला तिकीट देण्यात आले. त्यामुळे मी अपक्ष लढलो पण शिवसेनेने तिकीट दिलेल्या त्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली. असे चुकीचे तिकीट वाटप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
तीन हजारांची लीड सांगणाऱ्यांचे डिपॉझिट का गेले ?
संपर्कप्रमुख सावंत यांनी कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले. मात्र, नंतर आपल्या भाषणातून कानउघाडणीही केली. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी अनेकजण भेटायचे. अमूक प्रभागातून आपण तीन हजाराने निवडून येतो, असा दावा करायचे. निकालानंतर मात्र त्यांचे डिपॉझिट गेले. अनेकांना दखलपात्र मतेही मिळाली नाहीत. हे असे का घडले यावर संबंधितांनी आत्मचिंतन करण्याची गरज सावंत यांनी व्यक्त केली.