मिहानमधील वाघोबा लपला कुठे? पिंजरे लावण्याचीही शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:20 PM2019-11-30T23:20:26+5:302019-11-30T23:22:12+5:30
मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले.
वनविभागाच्या पथकाशी त्याचा सुरू असलेला लपंडाव जवळपास १५ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळी त्याच्या शोधासाठी पुन्हा पथकांची संख्या वाढविली जाण्याची शक्यता आहे. वाघ दिसल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचा किंवा त्याला त्याच्या संरक्षित अधिवास क्षेत्रात हाकलण्याचाही प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी २९ नोव्हेंबरला मिहानमधील इन्फोसिस कंपनीच्या मागील भागात असलेल्या नहराजवळ लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला होता तर त्यापूर्वी बुधवारी २७ नोव्हेंबरच्या रात्री इन्फोसिस कंपनीच्या सीसीटीवी फुटेजमध्येही तो आला होता.
त्याचा या परिसरातील वावर आणि अधिक काळापासून मांडलेले ठाण स्थानिकांसाठी धोकादायक ठरले आहे. हे लक्षात घेता गुरुवारच्या रात्री नागपूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार यांनी मिहान परिसराचा दौरा करून आढावा घेतला व पाहणी केली. शुक्रवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूलाही घटनास्थळांचे निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या.
१५ दिवसांपूर्वी वाघ मिहानमधील इन्फोसिस कंपनीच्या मागील भागात एका कर्मचाऱ्याला दिसला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या परिसरात त्याच्या पंजाचे ठसेही मिळाले होते. दोन दिवसानंतर पुन्हा इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी वाघ दिसल्याचा दावा केला होता. या काळात वनविभागाने आधी १५ व नंतर ३० कॅमेरे लावले होते. याच काळात बुटीबोरी रेंजमधील सुमठाना, वाकेश्वर, खडका, सोंडापारपर्यंत फिरून गुरुवारी २७ नोव्हेंबरला तो पुन्हा मिहानमध्ये परतला आहे.
अंबाझरीतील बिबट्याचाही शोध सुरू
अंबाझरी जंगलाच्या अंबाझरी जैव विविधता पार्कमध्ये गुरुवारी दिसलेल्या बिबट्याच्या पगमार्कनंतर प्रत्यक्ष त्याचा मात्र शोध लागलेला नाही. शनिवारी पथकाने दिवसभर त्याचा शोध घेतला. मात्र पत्ता लागला नाही. गुरुवारी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना पार्कच्या कक्ष क्रमांक ७९७ मध्ये हे पगमार्क दिसले होते. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून तीन दिवसपर्यंत पार्क पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. दोन दिवस शोध घेऊनही कुठेच पत्ता लागलेला नाही. रविवारी पुन्हा पथकांकडून शोध घेतला जाणार आहे.