जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:34+5:302021-03-06T04:08:34+5:30

- गजानन महाराज प्रगटदिनोत्सव : भक्तांनी संयम दाखवत टाळली गर्दी - देवस्थानांनीही पाळले कोरोना संक्रमणाचे नियम लोकमत न्यूज नेटवर्क ...

Wherever you look, you don't see it | जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना

जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना

Next

- गजानन महाराज प्रगटदिनोत्सव : भक्तांनी संयम दाखवत टाळली गर्दी

- देवस्थानांनीही पाळले कोरोना संक्रमणाचे नियम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा। करूनी गणि गण गणांत बोते या भजना॥ ध्याता हरिहर (नरहरी) गुरुवर तूंचि सुखसदना। जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना॥’ असा भाव हृदयात जपत भाविकांनी श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सव साजरा केला. एरवी शहरात प्रगटदिनोत्सवाला ठिकठिकाणी गर्दी उसळली असते. वेगवेगळ्या संस्था, संघटना ठिकठिकाणी महाप्रसाद, रथयात्रेचे आयोजन करत असतात. देवस्थाने भक्तांच्या अलोट गर्दीने न्हाऊन निघत असतात आणि सर्वत्र ‘जय गजानन’, ‘गण गण गणात बोते’चा गजर होत असतो. हा गजर यंदाही झाला. मात्र, या गजराला, भक्तांच्या भक्तीला संयमाचा तर देवस्थान विश्वस्त मंडळांच्या आयोजनाला सुदृढ नियोजनाचा आधार दिसून आला. कुठेच आततायीपणा नव्हता, कुठेच कोरोना संक्रमण नियमांचा कडेलोट नव्हता. सर्वांनी गजानन महाराजांच्या चरणी भक्तीचे पुष्प अर्पण करत कोरोना संक्रमणाच्या दुष्चक्रातून नौका पार करण्याची आर्त भावना श्रीचरणी अर्पण केली.

शहरात श्री गजानन महाराजांची अनेक स्थळे आहेत. प्रत्येक स्थळांवर प्रगटदिनोत्सवाची जय्यत तयारी होती. मात्र, कोरोना संक्रमणाचा नव्याने झालेला उद्रेक बघता, सर्वत्र कायदा पाळण्याचेच आवाहन केले जात होते. यंदा कुठेही महाप्रसादाचे आयोजन झाले नाही. एवढेच नव्हे तर प्रसाद वाटपही टाळण्यात आले. देवस्थानांमध्ये भक्तांना प्रवेश होता. मात्र, एकावेळी मर्यादित भक्तांनाच प्रवेश दिला जात होता. देवस्थानांमध्ये दर्शनास येणाऱ्या भक्तांचे थर्मल स्कॅनिंग आवर्जून होत होते. मास्क अनिवार्य करण्यात आले होते. निर्जंतुकीकरण द्रव्याचा सतत मारा केला जात होता. भक्तही देवस्थानांच्या या नियोजनाला प्रतिसाद देत होते.

---------

गजानन महाराज मंदिर, अंबाझरी ()

अंबाझरी तलावाच्या शेजारी असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात गर्दी टाळण्यात आली होती. दरवर्षी येथे भक्त प्रसाद व महाप्रसाद ग्रहण केल्याशिवाय परतत नव्हते. यंदा मात्र, ते सर्व सोपस्कार टाळण्यात आले. भक्तांना मनोभावे दुरूनच दर्शन करण्याचे आवाहन केले जात होते.

कापरेंचे श्री गजानन महाराज मंदिर, धरमपेठ ()

धरमपेठ, ट्राफिक चिल्ड्रेन पार्क परिसरात असलेल्या कापरेंचे श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन होत असते. दरवर्षी येथे सेवाकऱ्यांचा मोठा ताफा असतो. मात्र, यंदा हे आयोजन टाळण्यात आले. भक्तांना दुरुनच दर्शन करण्यास सांगितले जात होते. यावर्षी चढावा चढविण्याचीही विनंती केली जात होती.

श्री गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्तीनगर ()

त्रिमूर्तीनगर, तलमले इस्टेट येथील श्री गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांचा प्रगटदिनोत्सव विविध धार्मिक अनुष्ठानांनी साजरा झाला. येथे आठवडाभरापासून गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुरू होते. अखेरच्या दिवशी अभिषेक घातला गेला. श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिश: अंतर, मास्क अनिवार्य होते. सर्वत्र सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरावर आकर्षक रोषणाई होती. यंदा दिंडी व यात्रा रद्द करण्यात आली. यावेळी प्रमोद जोशी, विलास गाढवे, शंकर ठाकरे, चिराग साठवणे, प्रशांत दरेकर, सतीश कोवे, मोहन वाढई, अक्षय बडे, प्रवीण निमजे उपस्थित होते.

छोटी धंतोली येथे प्रगटदिनोत्सव ()

छोटी धंतोली येथे नितीन व भावना कोन्हेरे यांच्या निवासस्थानी श्री गजानन महाराजांचा प्रगटदिनोत्सव साजरा झाला. यंदाचे अकरावे वर्ष होते. गेल्या आठ दिवसांपासून कान्हेरे कुटुंबीयांसह नीलिमा मस्के, दर्शना भोयर, लक्ष्मी येलेकर, शिवानी चौधरी, रीना मुदलियार, अरुण सपाटे, अबोली सपाटे यांनी श्रींच्या पोथीचे पारायण केले. यावेळी श्रींना प्रसाद अर्पण करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता कार्यक्रम आटोपशीर पार पडला. यावेळी राजेश मस्के, संजय डबली, लोंदे, तेलंग उपस्थित होते.

गजानन महाराज श्रद्धास्थान येथे रक्तदान ()

रेशीमबाग, गजानन चौक येथील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान येथे प्रगटदिनोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, डॉ. विलास डांगरे, श्रद्धास्थानाचे संयोजन गिरीश वराडपांडे, नगरसेवक शीतल कामळे, रवींद्र भोयर, प्रशांत कामळे, पाटणकर, काशिनाथ उमरेडकर उपस्थित होते. यंदा पालखीचे आयोजन करण्यात आले नाही. त्याच पार्श्वभूमीवर नामस्करणाने देवस्थानास २१ प्रदक्षिणा घातल्या गेल्या. इतर नैमित्तिक अनुष्ठाने पार पाडण्यात आली. यावेळी नरेंद्र गोरले, प्रकाश निमजे, बाळ भेंडे, दीपक वाळके, नरेश ईटनकर, रमाकांत पेंडके, अरविंद पिट्टलवार, आदित्य देव, मोहन रसेकर, कुशल ठवकर, सागर राऊत, सीमा पेंडके, दीपाली निमजे, लता तेलंग, मंगला पोटे, ज्योती तितरमारे उपस्थित होते.

Web Title: Wherever you look, you don't see it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.