जे महाराष्ट्रात शक्य नाही, ते त्रिपुरात करून दाखविणार; बिप्लब कुमार देब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 11:08 AM2018-08-01T11:08:54+5:302018-08-01T11:46:22+5:30
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे तसे तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी जास्त चर्चेत असतात. मात्र त्यांच्यातील अभ्यासू चेहरा मंगळवारी नागपुरात अनुभवायला मिळाला. वैज्ञानिक प्रगतीसोबतच राज्याला ‘इकोफ्रेंडली’ बनवायचे आहे. तसेच कृषी क्षेत्राचा दर्जा उंचावून महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यावर आपला भर असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे तसे तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी जास्त चर्चेत असतात. मात्र त्यांच्यातील अभ्यासू चेहरा मंगळवारी नागपुरात अनुभवायला मिळाला. वैज्ञानिक प्रगतीसोबतच राज्याला ‘इकोफ्रेंडली’ बनवायचे आहे. तसेच कृषी क्षेत्राचा दर्जा उंचावून महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यावर आपला भर असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
जैविक शेती ही काळाची गरज आहे. त्रिपुरात कृषीमध्ये जैविक पद्धतीचा वापर जास्तीत जास्त कसा वाढेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या राज्यात अगोदरपासूनच अननस, चहा, जॅकफ्रुट, संत्री, काजू बादाम, आले इत्यादींचे जैविक पद्धतीने उत्पादन होते. महाराष्ट्राच्या तुलनेत त्रिपुराचे क्षेत्रफळ लहान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना जे जमणार नाही ते आम्ही त्रिपुरात करुन दाखवू शकतो. ईशान्येत सिक्कीम हे पूर्णपणे जैविक शेती करणारे देशातील पहिले राज्य होते. आम्ही महाराष्ट्राच्या अगोदर त्रिपुराला जैविक राज्य करुन दाखवू शकतो, असा विश्वास बिप्लब कुमार देब यांनी व्यक्त केला. यासाठी आम्ही पावले उचलली असून कृषी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामस्वराज्यातून देशाचा विकास हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. त्याच आधारावर नरेंद्र मोदी हेदेखील काम करत असून आम्ही हे स्वप्न पूर्ण करून दाखवू, असे ते म्हणाले. मनरेगा तसेच इतर योजनांच्या माध्यमातून आम्ही राज्यभरात अननस तसेच बांबू यांचे वृक्षारोपण करत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
‘इकोफ्रेंडली’ विकास साधणार
ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर ही एक मोठी समस्या आहे. वनांची तोड होत असल्यामुळे ही समस्या विक्राळ रूप घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईशान्येकडील राज्यांमधील एकही झाड कापले जाऊ नये, असे निर्देश दिले होते. यात नंतर थोडी शिथिलता आणण्यात आली. आता बांबूच्या झाडांचीदेखील तोड करण्याची परवानगी देण्यात आहे. यामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. राजधानी आगरतळा येथेदेखील प्रचंड समस्या आहे. या समस्यांवर तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांची सांगड घालून उत्तर शोधण्यात येईल. केवळ पर्यावरणाच्या मागे लागून अनेकदा पर्यावरणाचे नुकसान करण्यात येते. आम्ही मात्र राज्याचा ‘इकोफ्रेंडली’ विकास साधू, असा दावा त्यांनी ‘लोकमत’जवळ केला.
गडकरी हे तर ‘सुपरफास्ट’ नेते
यावेळी बिप्लब कुमार देब यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. गडकरी हे ‘सुपरफास्ट’ नेते आहेत. त्रिपुराला ‘इकोफ्रेंडली’ राज्य बनविण्यासाठी कर्नाटकातील भीमबांबू लावा, इथेनॉलचे उत्पादन वाढवा, असे सल्ले त्यांनी दिले आहेत. इतकेच काय तर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी तात्काळ चर्चादेखील करवून दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये बांबू मोठ्या प्रमाणावर होतो. याच बांबूच्या माध्यमातून देशाचे सुमारे एक लाख कोटींचे नुकसान टाळता येईल, असे देब म्हणाले.
त्रिपुरातील पूर परिस्थितीवर नीरीचा तोडगा
त्रिपुरात गेल्या अनेक काळापासून पुराची समस्या असून यामुळे पावसाळ््यात प्रचंड नुकसान होते. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा कशा पद्धतीने निघू शकतो यासंदर्भात त्यांनी नीरीचीच्या वैज्ञानिकांशी चर्चा केली. नीरीच्या वैज्ञानिकांचे संशोधन त्यांनी स्वत: समजावून घेतले. नीरीच्या वैज्ञानिकांनी हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये बांबूसदृश झाडांच्या मदतीने जमिनीची धूप थांबविली होती. येथील काही वैज्ञानिकांनी त्रिपुरात कामदेखील केले आहे. त्यांच्या मदतीने त्रिपुराची समस्या दूर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.