याला कोणता रस्ता म्हणायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:44+5:302021-08-12T04:12:44+5:30
भिवापूर : शेतात जाणारा पांदण रस्ता खस्ताहाल झाला आहे. रस्त्यावर ठेवलेला पाय कुठे एक तर कुठे दोन फुट फसतो. ...
भिवापूर : शेतात जाणारा पांदण रस्ता खस्ताहाल झाला आहे. रस्त्यावर ठेवलेला पाय कुठे एक तर कुठे दोन फुट फसतो. दोन दिवसांपूर्वी पांदण रस्त्यावरील खड्यात असाच एक बैल फसला. मरनासन्न अवस्थेत त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा आधार घ्यावा लागला. मालेवाड्यातील पांदण रस्त्यावर मरण, असे स्वस्त झाले असताना शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी मात्र सुस्त आहे.
मालेवाडा येथील विठ्ठल मंदिर ते इंगोले यांच्या शेतापर्यंत अंदाजे ३ किमी अंतराचा पांदण रस्ता आहे. पन्नासवर शेतकऱ्यांच्या जमिनीची वाहीजूपी याच पांदण स्त्याने होते. मागील कित्येक वर्षापासून या पांदण रस्त्याचे हाल बेहाल झाले असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेकदा केली. आता पावसाळ्यात या पांदण रस्त्याचे हाल पुन्हा बेहाल झाले आहे. संपूर्ण रस्ताच चिखलमय असून, खड्डेच खड्डे पडले आहे. हे खड्डे कुठे एक तर कुठे दोन फुट खोल आहे. त्यामुळे बैलबंडीचा प्रवास बंद झाला आहे. जीवितहानी झाल्यावर आमच्या पांदण रस्त्याकडे लक्ष देणार का, असा सूर अभिव्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना लक्षात घेता या पांदण रस्त्याची किमान डागडुजी तरी तत्काळ करावी, अशी मागणी राहुल गोवारदीपे, विकास गोवारदीपे, हेमाजी चौधरी, चिंधू चौधरी, श्रीकांत इंगोले, दिनकर इंगोले, अनंता इंगोले, प्रकाश चौधरी, नाना तिडके, सुरेश तिडके, रामदास राऊत, विलास इंगोले, बाबा इंगोले, भय्याजी इंगोले, हरिभाऊ राऊत, तुळशीराम आंभोरे, श्रीराम डवरे, लहू राऊत यांनी केली आहे.