कुणी शाळा? विकत घेता का शाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:08+5:302021-06-11T04:07:08+5:30
आशिष दुबे नागपूर : कोरोनाचे संक्रमण आणि सरकारच्या उदासीनतेचा फटका जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बसतो आहे. जिल्ह्यात ३२ शाळांच्या ...
आशिष दुबे
नागपूर : कोरोनाचे संक्रमण आणि सरकारच्या उदासीनतेचा फटका जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बसतो आहे. जिल्ह्यात ३२ शाळांच्या संस्थाचालकांवर शाळा विकण्याची वेळ आली आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून फी वसुली होऊ शकली नाही. त्यामुळे शाळांची आर्थिक स्थिती कमजोर बनली आहे. शाळेचा मेंटेनन्स करायला सुद्धा संस्थाचालक असमर्थ आहेत. परिणामी शाळा विकण्याचा निर्णय घेतला असून, ते खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, यात सावनेर तालुक्यातील ६, काटोल ३, रामटेक ६, उमरेड ८, ब्रम्हपुरी २, भिवापूर २, कोराडी ३ व वाडी येथील २ शाळा आहेत. यातील काही शाळा १० वर्षांपूर्वी सुरू झाल्या होत्या. काही शाळांना चार ते सहा वर्षे झाली आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट ३०० ते ७५० एवढा आहे. या शाळा स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर आहेत. त्यांना शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नाही. शाळेच्या संस्थाचालकांना शाळेची देखभाल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आदीवर खर्च करावा लागतो. या खर्चाची भरपाई विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या फीद्वारे होते. परंतु कोरोनामुळे विद्यार्थीच शाळेत येत नाहीत आणि फी सुद्धा वसूल होत नाही.
- संस्थाचालकांकडे पर्यायच नाही
याला मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टाकसाळे यांनीही दुजोरा दिला आहे. संस्थाचालकांकडे पर्याय नसल्याने त्यांना शाळा विकावी लागत आहे. सामान्य लोकांची मानसिकता आहे की, संस्थाचालकांकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे शाळेची फी सुद्धा देत नाहीत. संस्थाचालकांचे आर्थिक स्त्रोत आटले आहेत. या परिस्थितीमुळे ३२ शाळांची विक्री होत आहे.