"अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कोणता साहित्यिक सरकारला थेट प्रश्न विचारतो?"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 09:40 PM2023-02-16T21:40:27+5:302023-02-16T21:41:05+5:30
Nagpur News अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कोणता लेखक-साहित्यिक आज सरकारला थेट प्रश्न विचारू शकतो का? असा सवाल ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे उपस्थित केला.
नागपूर : एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर सर्व मजूर एकत्र येऊन त्याचा विरोध करतात. परंतु, एखाद्या साहित्यिक-लेखकावर अन्याय झाला तर विरोध होत नाही. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारख्या लेखकांची हत्या झाली. मात्र, एकाही लेखकाने विरोध दर्शविला नाही. राजकारणी घाबरले असतील पण लेखक का घाबरले? साहित्यिकांच्या संघटना का घाबरल्या?, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कोणता लेखक-साहित्यिक आज सरकारला थेट प्रश्न विचारू शकतो का? असा सवाल ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे उपस्थित केला. आज सरकारही विकत घेतले जाते, पण साहित्यिक ओरडत नाहीत. त्यांना सन्मान व पुरस्कार दिसतात, पण आत्मसन्मान व मूल्यनिष्ठा दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
विदर्भातील प्रसिद्ध समीक्षक व साहित्यिक डॉ. प्रमोद मुनघाटे यांची साहित्य अकादमीच्या केंद्रीय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. यानिमित्त विदर्भ गौरव प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी शंकरनगर चौक येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात त्यांचा अभिनंदन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे प्रमुख अतिथी होते. अध्यक्षस्थानी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी होते. श्रीकांत तिडके, समीर सराफ व्यासपीठावर होते. अरुणा सबाने यांनी परिचय व भूमिका विषद केली. डॉ. कोमल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रगती पाटील यांनी आभार मानले.
सनदी अधिकारीच चालवितात साहित्य अकादमी
प्रा. महेश एलकुंचवार यांनी यावेळी साहित्य अकादमीला चांगले फैलावर घेतले. साहित्य अकादमीत हृदयशून्य असलेले व्यक्तींचा भरणा असतो. अकादमी ही (ब्युरोक्रॅट्स) सनदी अधिकारीच खऱ्या अर्थाने चालवितात. अकादमीतील कारभाराबाबत त्यांनी त्यांच्याशी घडलेला एक प्रसंगही यावेळी सांगितला.