बेरोजगारांची संख्या वाढली असताना ११ ‘ग्रा.पं.’मध्ये रोहयोचे एकही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:47+5:302021-06-10T04:07:47+5:30

उमरेड/भिवापूर/नरखेड/कुही/मौदा : मागेल त्याला काम या तत्त्वानुसार राज्य सरकारने १९७७ साली रोजगार हमी योजनेची सुरुवात केली. केंद्र सरकारने २००५ ...

While the number of unemployed has increased, Rohyo has no job in 11 villages | बेरोजगारांची संख्या वाढली असताना ११ ‘ग्रा.पं.’मध्ये रोहयोचे एकही काम नाही

बेरोजगारांची संख्या वाढली असताना ११ ‘ग्रा.पं.’मध्ये रोहयोचे एकही काम नाही

Next

उमरेड/भिवापूर/नरखेड/कुही/मौदा : मागेल त्याला काम या तत्त्वानुसार राज्य सरकारने १९७७ साली रोजगार हमी योजनेची सुरुवात केली. केंद्र सरकारने २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा लागू केला. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते. मात्र नागपूर जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमीच्या कामावर यंदा एकही पैसा खर्च करण्यात आला नसल्याची माहिती आहे. यासोबतच काही तालुक्यातील गावात गत दीड वर्षापासून १०० दिवसापेक्षा कमी काम मिळत असल्याने मजूरवर्गात नाराजी आहे.

नागपूर जिल्ह्यात ७७० ग्रामपंचायती आहे. याअंतर्गत १८७२ गावांचा कारभार चालतो. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट प्रभावी राहिली. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. अशात मजूरवर्गाला रोजगार हमीच्या कामाचा आधार होता. जिल्ह्यातील बहुतांश गावात रोहयोच्या कामातून गरिबांना रोजगार मिळाला. मात्र काही गावात अपेक्षाभंग झाला. प्रशासकीय पातळीवर या योजनेची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते. लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेली रोहयोची कामे गतवर्षी २० एप्रिलला सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यानंतर ग्रामीण भागात मजुरांना काहीअंशी काम मिळाले. या योजनेंतर्गत करावयाच्या कामाचा वार्षिक आराखडा दरवर्षी १५ ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत मंजूर करण्यात येतो. यानंतर कामांना सुरुवात होते. ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे कमी असतात. त्यामुळे गावातील शेजमजुरांना रोजगार हमीचा आधार असतो. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे काही गावात या कामांना खंड पडला.

मौदा तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायती आहेत. येथे २ ग्रा.पं.मध्ये रोहयोवर एकही पैसा खर्च करण्यात आला नाही. कुही तालुक्यात ५९ ग्राम पंचायती आहेत. येथे वडेगाव (मांढळ), हरदोली राजा, शिकारपूर येथे रोहयोवर एकही पैसा खर्च झालेला नाही. नरखेड तालुक्यात ७० ग्रामपंचायती आहे. येथे दोन ग्रा.पं.मध्ये रोहयोच्या कामावर एकही पैसा खर्च झालेला नाही.

सावनेर तालुक्यात ७५ ग्रामपंचायती आहेत. येथे बहुतांश ग्रा.पं.मध्ये रोहयोची कामे सुरू आहेत. कळमेश्वर तालुक्यात ५० ग्रामपंचायती आहे. येथेही बहुतांश ग्रा.पं.मध्ये कामे सुरू असल्याची माहिती पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांनी दिली. पारशिवनी तालुक्यात ५३ ग्रामपंचायती आहे. येथेही रोहयो अंतर्गत कामे सुरू आहेत.

भिवापूर तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. येथे रोहयोवर नेरी, चिखली, गाडेघाट येथे एकही पैसा खर्च झालेला नाही. उमरेड तालुक्यात ४७ ग्राम पंचायती आहेत. येथे केवळ एका ग्रा.पं.मध्ये रोहयोच्या कामाला यंदा सुरुवात झालेली नाही. काटोल तालुक्यात ८३ ग्राम पंचायती आहेत. येथे सर्व ठिकाणी कामे सुरु आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी

उमरेड : ०१

भिवापूर : ०३

नरखेड : ०२

कुही : ०३

मौदा : ०२

---

काय म्हणतात मजूर

लॉकडाऊन काळात आमच्यापुढे कुटुंबाचा आर्थिक गाडा कसा चालवावा ही सर्वात मोठी समस्या होती. ती रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दूर झाली.

अतुल सातपुते

शिरसावाडी (कामगार)

रोजगार हमी योजनेद्वारे कोरोना काळातही जगण्याचे आर्थिक बळ आम्हाला मिळाले.

-गजानन सीताराम मोरोलिया

गोन्ही (कामगार)

रोजगार हमी अंतर्गत काम मिळाले. ते पूर्णकाळ नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

राजू ठाकरे, सावळी

-----

काय म्हणतात अधिकारी

मौदा तालुक्यातील दोन ग्राम पंचायत मध्ये एकही मस्टर निर्गमित झालेले नसल्याने तिथे मजुरी शून्य दिसत आहे. भेंडाळा आणि झुल्लर या ठिकाणी ग्राम रोजगार सेवक नसून तिथे अभिसरण अंतर्गत घरकुलाचे कामे सुरू झाले की त्याचे हजेरीपत्रक सचिवामार्फत काढण्यात येईल.

-अमोल ठेंगे,

सहायक कार्यक्रम अधिकारी,

पंचायत समिती मौदा

--

कुही तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतमध्ये एक पण मस्टर निर्गमित झालेले नाही. कारण तिथे रोजगार सेवक नाही. तसेच उर्वरित ५६ ग्रामपंचायतमध्ये नरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर वृक्ष लागवड, घरकुल, पांदण रस्ते, नाला खोलीकरण,शोषखड्डे, तलाव खोलीकरण आदी २५० कामे सुरू आहेत. आज तारखेत एकूण १४०० मजूर रोहयो अंतर्गत काम करीत आहेत.

- दिगंबर वाल्मीक

सहायक कार्यक्रम अधिकारी

पंचायत समिती ,कुही

---

नरखेड तालुक्यात फक्त दोन ग्रामपंचायतमध्ये रोहयोची कामे सुरू नाहीत. बाकी सर्व ग्रामपंचायतमध्ये रोहयो अंतर्गत कामे चालू आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायत मोहदी (धोञा) व खेडी कर्यात येथेही शोषखड्डयांची कामे सुरू करण्यात येईल.

- अविनाश सावरकर

सहायक कार्यक्रम अधिकारी, पं.स.नरखेड.

-

या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ तीन ग्रामपंचायतीमध्ये रोहयो अंतर्गत कामे झाली नाहीत. यात नेरी सावरगाव ही ग्रामपंचायत गोसेखूर्द बाधित असल्यामुळे येथे कामे करता येत नाही. उर्वरीत दोन ग्रामपंचायतीअंतर्गत यावर्षी नव्याने कामे प्रस्तावित आहे. कोरोनामुळे कामांना सुरूवात करता आलेली नाही.

- मोहन महाजन

सहायक कार्यक्रम अधिकारी, रोहोयो,भिवापूर

--

उमरेड तालुक्यातील एकूण ४७ ग्रामपंचायतपैकी केवळ हेवती या गावात रोहयोवर शून्य पैसे खर्च झाले. याठिकाणी मागील काही वर्षांपासून पुनर्वसनाचे कार्य सुरू असल्यामुळे खर्च करता आला नाही.

जे. जी. जाधव

खंड विकास अधिकारी,

पंचायत समिती, उमरेड

३) सरपंच काय म्हणतात?

रोजगार हमी योजनेंतर्गत कामे आहे. परंतु मजूर काम करायला तयार नाहीत.

- दीपक नाखले, उपसरपंच, मोहदी (धोत्रा)

--

भेंडाळा येथे ग्रामरोजगार सेवक कार्यरत नाही. त्यामुळे मोठे कामे करणे शक्य होत नाही. परंतु घरकुल कामाचे हजेरी पत्रक पंचायत समिती स्तरावरून काढण्यात येत आहे. वारंवार दवंडी देऊनही गावातील कोणीही व्यक्ती रोजगार सेवकाचे काम करण्यास तयार नाही.

- राधेश्याम श्रावण मानकर,

सरपंच, भेंडाळा. ता.मौदा

----

गत वर्षी रोजगार सेवक गुणवंता वासनिक यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कोविडमुळे ग्रामसभा न झाल्याने ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक नेमलेला नाही. त्यामुळे रोजगार हमीतील निधीची उचल केली नाही. कामे सुद्धा प्रस्तावित झालेली नाही.त्यामुळे एकही पैसा खर्च केला नाही.

जितू लुटे

सरपंच, वडेगाव (मांढळ), ता.कुही

---

पांदण रस्त्यांची कामे आहेत. माञ मजुरांअभावी कामे करता येत नाही. यावर्षी शौच खड्डे, कॅटलशेड सारखी कामे आम्ही करणार आहोत. कोरोनामुळे सुध्दा बरीच कामे व कामांचे नियोजन करता आलेले नाही.

- किशोर सयाम, सरपंच, चिखली

Web Title: While the number of unemployed has increased, Rohyo has no job in 11 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.