‘एमडी’ विकताना नागपुरात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:00 AM2019-03-12T00:00:51+5:302019-03-12T00:04:52+5:30
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला ‘एमडी’ (मेफड्रॉन) विकताना अटक करण्यात आली आही. सदरमधील एका शाळेजवळ तो ‘एमडी’ची विक्री करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अमन मसराम (२३) असे आरोपीचे नाव असून, त्याचे वडील ‘एसआरपी’चे निवृत्त कर्मचारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला ‘एमडी’ (मेफड्रॉन) विकताना अटक करण्यात आली आही. सदरमधील एका शाळेजवळ तो ‘एमडी’ची विक्री करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अमन मसराम (२३) असे आरोपीचे नाव असून, त्याचे वडील ‘एसआरपी’चे निवृत्त कर्मचारी आहेत.
अमन अगोदर एका खासगी बँकेत काम करायचा. मात्र तेथे घोळ केल्याने त्याला सहा महिन्यांअगोदर नोकरी गमवावी लागली. त्यानंतर तो बेरोजगार होता. त्याचे बहुतांश मित्र ‘एमडी’ सेवन करणारे आहेत. त्यामुळेच त्यालादेखील हे व्यसन लागले. त्याच्या व्यसनामुळे कुटुंबीयदेखील त्रस्त होते. पैशांअभावी अमनला व्यसन करणे शक्य होत नव्हते. त्यातूनच त्याने ‘एमडी’ची विक्री करण्यास सुरुवात केली. तरुण तसेच विद्यार्थ्यांना तो ही विक्री करायचा. अमन सदर येथील एका शाळेसमोर ग्राहकाला ‘डिलिव्हरी’ द्यायला आला होता. गुन्हे शाखेच्या ‘एनडीपीएस सेल’ला याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व अमनला अटक केली. पोलिसांनी ‘एमडी’ व रोख रकमेसह अॅक्टिव्हादेखील जप्त केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमन मागील सहा महिन्यांपासून ‘एमडी’च्या विक्रीत होता. त्याचे मोठ्या तस्करांशी संबंध आहेत. त्याच्याकडून पोलिसांना अनेक मोठी नावे कळू शकतात. पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात एसीपी सुधीर नंदनवार, निरीक्षक राजू बहादुरे, एपीआय शशिकांत पाटील, एएसआय अविनाश तायडे, हवालदार अजय ठाकूर, संतोष ठाकूर, विनोद मेश्राम, नितीन रांगणे, राहुल गुमगावकर, सचिन सेलोकर, अमोल पडधान तसेच कुंदा जांभुळ यांच्या पथकाने कारवाई केली.
१२ दिवसात तीन कारवाई
२५ फेब्रुवारी रोजी पाचपावली पोलिसांनी कुख्यात मोहित साहू व त्याच्या साथीदाराला अटक करून ८७ हजार रुपयांचे ‘एमडी’ जप्त केले होते. ४ मार्च रोजी गुन्हे शाखेने आॅटो चालक इरफान खान ऊर्फ सोनू निसार खान याला ६० हजार रुपयांच्या ‘एमडी’सह अटक केली होती. त्याअगोदर गँगस्टर आबू खान व त्याच्या दोन सहकाऱ्यांना ‘एमडी’ तस्करीत अटक झाली.
ओडिशातील गांजा तस्कराला अटक
‘एनडीपीएस सेल’ने संभलपूर, ओडिशा येथील निवासी रायबीरेंद्र सिंह किरपाल सिंह याला २१ किलो गांजासह अटक केली. या गांजाची किंमत २ लाख १० हजार रुपये आहे. तो ट्रकने नागपूरला आला होता. त्याने अगोदरदेखील शहरात गांजाविक्री केली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, हवालदार तुलसी शुक्ला, दत्ता बागुल, प्रदीप पवार, सतीश पाटील, नितीन मिश्रा, नितीन साळुंके तसेच रुबीना शेख यांच्या पथकाने कारवाई केली.